सुधागडमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव सोहळा

सुधागडमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव सोहळा
Published on

सुधागडमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव सोहळा
‘एक दिवस माझा’ उपक्रम उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २५ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील महिला शिक्षिकांसाठी ‘एक दिवस माझा’ हा विशेष उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उत्साहात झाला. या कार्यक्रमात शिक्षिकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्या शर्मिला बोडके, सुधागड तालुक्याच्या सभापती जागृती मानकर, पंचायत समिती सदस्या प्रणिता परदेशी, माजी सरपंच श्रद्धा कानडे, बौद्ध पंचायत महिला कमिटी अध्यक्ष अस्मिता कांबळे, रेश्मा गायकवाड आणि दीक्षा दंत या महिला उपस्थित होत्या.
शिक्षण विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या शिक्षिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये संगीता औताडे (शब्दकोडे निर्मिती स्पर्धा - राज्य चतुर्थ क्रमांक), शीतल पाटील (डॉक्युमेंटरी स्पर्धा - राज्य सातवा क्रमांक), रूपाली पांढरे (थाळीफेक स्पर्धा - राज्य आठवा क्रमांक) आणि भाग्यश्री हाके (गोळाफेक स्पर्धा - राज्य आठवा क्रमांक) यांचा समावेश होता. विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल स्मिता सुजित जगताप (राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२६), अर्चना गणेश साळुंके (राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार २०२६) आणि वृषाली मनोज गुरव (जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५-२६) यांचाही गौरव करण्यात आला. विभाग व तालुकास्तरावरील यशस्वी शिक्षिकांनाही सन्मानित करण्यात आले.
नृत्य व मनोरंजक खेळांमध्ये शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. उमा उप्पार यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. सूत्रसंचालन प्रज्ञा काळभोर यांनी केले. उपक्रमाची संकल्पना स्मिता जगताप यांची होती. महिला शिक्षिकांना एकत्र आणणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com