वाढत्या उन्हात पशुधनाची घ्या काळजी

वाढत्या उन्हात पशुधनाची घ्या काळजी
Published on

वाढत्या उन्हात पशुधनाची घ्या काळजी
रायगड पशुसंवर्धन विभागाचे आवाहन; उष्माघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३० (वार्ताहर) : राज्यात पारा वाढू लागल्याने माणसांप्रमाणेच पशुपक्षी आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे पशुधनाची वाताहत होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली असून पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना आणि उपाययोजना जारी केल्या आहेत. पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते, परिणामी दुग्ध उत्पादनावर मोठा परिणाम होतो. विशेषतः म्हशींना त्यांच्या काळ्या रंगामुळे आणि शरीरातील कमी घामग्रंथींमुळे गायींच्या तुलनेत अधिक त्रास होतो. हा धोका टाळण्यासाठी जनावरांना थंड वातावरणात चारा देणे, युरिया प्रक्रिया केलेला चारा आणि मुरघासचा वापर करणे फायदेशीर ठरते. तसेच, जनावरांचे नियमित लसीकरण आणि जंतनाशक औषधोपचार पूर्ण करून घेण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.
जनावरांच्या आहारात मिठाचा वापर वाढवावा आणि पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स मिसळावेत. दुधाळ जनावरांना संतुलित पशुखाद्यासोबत खनिज मिश्रणे द्यावीत. पक्ष्यांच्या बाबतीत त्यांच्या खुराड्यांमध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच, मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती सार्वजनिक ठिकाणे किंवा जलसाठ्यांपासून दूर लावावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चौकट
या उपाययोजना ठरणार प्रभावी
गोठ्याची उंची जास्त असावी. छप्पराला पांढरा चुना लावावा किंवा त्यावर पालापाचोळा टाकावा. गोठ्याभोवती ओले बारदाणे किंवा शेडनेट लावावेत. जनावरांना मुबलक थंड पाणी द्यावे. गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. बैलांकडून शेतीची कामे केवळ सकाळी किंवा संध्याकाळी करून घ्यावीत. भर उन्हात मशागत टाळावी. गोठ्याचा परिसर थंड ठेवण्यासाठी सभोवताली सावली देणारी झाडे लावावीत.
कोट
उष्माघातापासून होणारे पशुधानाचे नुकसान टाळण्यासाठी रायगड पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे. पशुसंवर्धन विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, कृपया त्याची पशुपालकांनी अंमलबजावणी करावी, जेणेकरून उष्माघात टाळता येईल.
डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड.

फोटो ओळ: पाली: उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी झाडाच्या सावलीत विसावलेली जनावरे. (छायाचित्र: अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com