

सुधागडात फळबागांना मिळणार संजीवनी
‘जलकुंड’ योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान
पाली, ता. २ (वार्ताहर): सुधागड तालुक्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘जलकुंड’ योजना खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या जलकुंडांच्या कामांची नुकतीच तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली. या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोकणात आंबा, काजू आणि नारळ यांसारख्या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, दरवर्षी डिसेंबर ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीत संरक्षित सिंचनाची सोय नसल्यामुळे लावलेली नवीन कलमे सुकण्याचे प्रमाण मोठे असते. सिंचनाअभावी होणारे हे नुकसान टाळण्यासाठी जलकुंड योजना प्रभावी ठरत आहे. तालुक्यात आतापर्यंत ६२ जलकुंडांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत लावलेल्या फळबागांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जलकुंडामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण (लाइनिंग) करण्यात येते, ज्यामुळे पाण्याची गळती रोखली जाते. एका जलकुंडात सुमारे ५२,७३१ लिटर पाणी साठवले जाते. १० ते २५ गुंठे क्षेत्रासाठी एक जलकुंड, तर जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठी आठ जलकुंडांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
संरक्षित सिंचन उपलब्ध झाल्यामुळे फळबागांची जगण्याची क्षमता वाढणार असून, भविष्यात उत्पादनक्षमतेतही मोठी सुधारणा होणार आहे. ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचे साधन बनत असल्याचे दिसून येत आहे. पाहणीदरम्यान कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन आणि बागेची निगा राखण्याबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले.
फोटो ओळ, पाली, तालुक्यातील जलकुंड कामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम व सोबत लाभार्थी शेतकरी. (छायाचित्र: अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.