

रायगड अजूनही क्षयरोगमुक्तीपासून दूर
जिल्ह्यात तीन महिन्यांत ८७९ नवे रुग्ण; २,५४९ रुग्णांवर उपचार सुरू
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : रायगड जिल्ह्यात क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असले तरी अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही. जिल्ह्यात सध्या एकूण दोन हजार ५४९ क्षयरुग्णांवर उपचार सुरू असून, जानेवारी ते मार्च या अवघ्या तीन महिन्यांत ८७९ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
क्षयरुग्ण शोधमोहिमेला अलीकडच्या काळात गती देण्यात आली असून, त्यातून नव्याने रुग्ण निदर्शनास येत आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात क्षयरोगाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. संसर्गाचा वेग अद्याप कमी झालेला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. उपचार अर्धवट सोडणे, वेळेवर तपासणी न करणे तसेच सामाजिक भीतीमुळे अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून, नियमित व संपूर्ण औषधोपचार घेणे अत्यावश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी १०० दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कर्मचारी घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी करणार असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी औषधे अर्धवट सोडू नयेत, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान
जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३६५ ग्रामपंचायतींमध्ये क्षयरुग्ण आढळत असून, सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण या भागांमध्ये आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२३ पासून ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ अभियान राबविण्यात येत असले तरी तीन वर्षांनंतरही या ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
३६५ ग्रामपंचायती क्षयमुक्तीच्या प्रतीक्षेत
रायगड जिल्ह्यातील दोन हजार ५४९ क्षयरुग्णांवर उपचार सुरू असून, हे क्षयरुग्ण जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२३ पासून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र तीन वर्षांनंतरही जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील ४४५ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असल्या तरी संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करायचा आहे. नागरिकांनीही क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि त्वरित उपचार सुरू करावे.
- डाॅ. प्राची नेहुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.