

जिल्हा परिषदेची पहिलीच सभा वादळी
शिक्षण, पाणी, आरोग्य विषयावर केंद्रस्थानी; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर रायगड जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ७) पार पडली. जिल्ह्यात शिक्षण, पाणी आणि आरोग्य व्यवस्थेवरून नवनिर्वाचित सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तरे देताना चांगलीच भंबेरी उडाली.
शिक्षण विभागातील समस्यांवर सदस्यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या रोखठोकपणे मांडल्या. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची चांगलीच भंबेरी उडाली. या सभेत शिक्षण विभागातील अनागोंदीवर कारभारावर जोरदार चर्चा झाली. याशिवाय प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, विद्यार्थ्यांअभावी बंद पडत चाललेल्या प्राथमिक शाळा, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांचे समायोजन, शाळांमधील असुविधा आणि या सर्व प्रश्नांकडे होणारे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष या मुद्द्यांवर सर्वच सदस्यांनी शिक्षणाधिकारी दहीतुले यांना प्राची जाधव, मानसी दळवी, अनिल बसवत, नीलेश ताठरे, संतोष बैलमारे, अनन्या गाताडे, नमिता घारे या सदस्यांनी अक्षरशः धारेवर धरले. दरम्यान, जिल्हा परीषद अध्यक्ष महेंद्र वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत चंद्रकांत कळंबे, वैकुंठ पाटील, नारायण डामसे, रसिका केणी, अनंत गोंधळी, अमित नाईक, डॉ. सचिन राऊळ, गीता जाधव, नीलेश कुंभार, डॉ. मनीष पाटील यांनी कामकाजात भाग घेताना विविध मुद्दे उपस्थित केले.
जलजीवनवर सदस्य आक्रमक
जलजीवन मिशन योजनेच्या कामांतील त्रुटींमुळे ग्रामीण जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याची खंत सदस्यांनी बोलून दाखवली. त्यावर महेंद्र वाकडीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेतला जाईल. कामे न करता बिले काढणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, तसेच अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत वाकडीकर यांनी दिले.
आरोग्यविषयक समस्या
काही प्राथमिक आरोग्य केंद्रावर तेथील वैद्यकीय अधिकारी मुक्कामास नसल्याने रात्री येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाहीत. तसेच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत दिलीप भोईर यांनी व्यक्त केले. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहूलकर यांनी दुजोरा देत ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
निकृष्ट पोषण आहार
अंगणवाडीतील मुलांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याचा मुद्दा कर्जतच्या सुनीता मोरे यांनी उपस्थित केला. हे प्रकरण गांभीर्यांने घ्यावे, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली. त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला रसिका केणी यांनी दुजोरा दिला. बालकांचा पोषण आहार माशांना खायला दिला जात असल्याचे केणी यांनी सभागृहात नमूद केले. त्यावर चांगले खाद्य पुरवणारा ठेकेदार नेमण्यात येईल, असे सांगून उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी विषय गुंडाळला.
.....
फोटो ओळ : रायगड जिल्हा परिषद पहिलीच सर्वसाधारण सभा.