

कासवाची ६७९ पिल्ले झेपावली समुद्रात
रायगड किनारपट्टीवर कासव संवर्धनाला वेग; ‘कासव मित्र’ यांच्या मदतीने अंडी सुरक्षित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन, आरावी आणि दिवेआगर या किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाला गती मिळाली आहे. यंदाच्या हंगामात या भागात तब्बल दोन हजार ७२ कासवांची अंडी आढळून आली असून, मार्च अखेरपर्यंत ६७९ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात झेपावली आहेत.
रायगडच्या सुमारे १२२ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संरक्षणासाठी कांदळवन विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कासवांमध्ये नैसर्गिकरीत्या पालकत्वाची भावना नसल्यामुळे अंडी घातल्यानंतर मादी पुन्हा समुद्रात परतते. त्यामुळे अंड्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे ठरते. भटके कुत्रे, मुंगूस, घोरपड आणि मानवी हस्तक्षेपामुळे अंड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कांदळवन विभाग आणि स्थानिक ‘कासव मित्र’ यांच्या मदतीने अंडी सुरक्षित ठिकाणी उबवणी केंद्रात (हॅचरी) हलवावी लागतात. तेथे त्यांना तापमान नियंत्रित ठेवून कृत्रिम वातावरणात अंड्यांचे संरक्षण केले जाते. साधारणतः ४५ ते ५५ दिवसांच्या कालावधीनंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. त्यानंतर या पिल्लांना योग्य वेळी समुद्रात सोडून त्यांना नैसर्गिक अधिवासात परतवले जाते.
अलिबागचे कांदळवन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन, मारळ, दिवेआगर आणि आरावी या किनाऱ्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत असून, मागील वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात जास्त पिल्ले उबवण्यात आली आहेत. स्थानिक स्वयंसेवकांचा सहभागही या उपक्रमात महत्त्वाचा ठरत आहे. या संवर्धन मोहिमेमुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संख्येत वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कासव मित्र या संकल्पनेला चांगले यश येत आहे. कासवांच्या अंड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक जनजागृती केल्याने रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कासवांचा सुरक्षित अधिवास वाढत चालला आहे. जो अधिवास हजारो वर्षांपासून होता, परंतु मागील काही वर्षांपासून मानवी हस्तक्षेपामुळे कासवांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या, त्या पुन्हा सुरक्षित होत आहेत.
- कुलदीप पाटकर, कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी-रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.