

सीएसआर फंडातून आरोग्यसेवेला बळकटी
आरसीएफकडून जिल्हा रुग्णालयातील कोट्यावधींची मदत; हाय-टेक नर्सिंग सेंटरचा गरजूंना लाभ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवांना अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) यांनी सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत कोट्यवधींची मदत दिली आहे. या उपक्रमामुळे रुग्णालयातील सुविधा अत्याधुनिक होत असून, रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होत आहे. याचा उपयोग जिल्हाभरातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना होत आहे.
आरसीएफने २०२०-२१ मध्ये रुग्णालयासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी ७४.६९ लाख रुपयांचा निधी रुग्ण कल्याण समितीकडे वर्ग केला. त्यानंतर २०२२-२३ मध्ये सुमारे १.३७ कोटी रुपये किमतीची प्रगत उपकरणे रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे यांनी दिली आहे. यामध्ये ऑपरेशन टेबल, स्वयंचलित स्टेरीलायझर, एबीजी मशीन यांचा समावेश असून, यामुळे रुग्णालयाची निदान व उपचार क्षमता अधिक सक्षम झाली आहे. शस्त्रक्रिया तसेच आपत्कालीन सेवांमध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. याच कालावधीत रुपये १८.३५ लाख किमतीची आवश्यक औषधे पुरवण्यात आली असून, याचा लाभ विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना झाला आहे. कोविड काळात ऑक्सिजनची गरज ओळखून आरसीएफने रायगड जिल्ह्यात पीएसए ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५४.८९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा सक्षम होऊन गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला.
हाय-टेक नर्सिंग सेंटर
२०२४-२५ मध्ये हाय-टेक नर्सिंग सेंटर उभारण्यासाठी रुपये २५.७३ लाखांची मदत देण्यात आली आहे. तसेच, डायलिसिस विभागासाठी आवश्यक औषधे व सोल्यूशन्स खरेदीसाठी २० लाखांचा निधी देण्यात आला आहे. याचे उद्घाटन अलीकडेच झाले. आरसीएफच्या या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल येथील आरोग्यसेवांची गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत असून, जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सक्षम व सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.