महामानवाचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प व्याख्यान आणि प्रबोधनातून रंगणार ''भीम जयंती''! वैचारिक क्रांतीसाठी रायगडकर सज्ज

महामानवाचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प व्याख्यान आणि प्रबोधनातून रंगणार ''भीम जयंती''! वैचारिक क्रांतीसाठी रायगडकर सज्ज
Published on

महामानवाचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प
व्याख्यान आणि प्रबोधनातून रंगणार भीमजयंती
वैचारिक क्रांतीसाठी रायगडकर सज्ज

पाली, ता. १२ (वार्ताहर) ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वेध संपूर्ण रायगड जिल्ह्याला लागले आहेत. यावर्षीची भीमजयंती केवळ गुलालाची उधळण आणि मिरवणुकांपुरती मर्यादित न राहता, महामानवाचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी व्याख्याने आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याकडे कल अधिक आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; मात्र गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे स्वरूप बदलताना दिसत आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश कृतिशील करण्यासाठी अनेक संस्था व संघटनांनी वक्त्यांची व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच महामानवाचे संदेश केवळ भिंतींवर न राहता ते आचरणात आणण्यासाठी यंदा अनेक ठिकाणी व्याख्यानमाला, ग्रंथदिंडी आणि संविधान साक्षरता मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. तरुण पिढीला बाबासाहेबांचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण कळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शिक्षक नूरखाँ पठाण हे मागील अनेक वर्षांपासून संविधान अनेकांपर्यंत पोहोचवून महत्त्व समजावून सांगून प्रबोधन करतात.

कोट १
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी आम्ही गावात व्याख्यानांचे आयोजन केले आहे. महामानवाचा जन्मदिन हा आनंदाचा उत्सव आहेच; पण त्यासोबतच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रबोधन आणि सर्वांप्रती बंधुभावाची भावना निर्माण व्हावी, यासाठी आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर देत आहोत.
- दिनेश शिर्के, पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रोहा


कोट २
महामानवाचे विचार डोक्यात रुजवणे आणि विचारांची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. विशेषतः तरुणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कार्यप्रणाली रुजावी, यासाठी विविध ठिकाणी व्याख्याने देत आहे. महामानव हा विचारात आणि कृतीत उतरला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ही जयंती सार्थ ठरेल.
- हभप महेश पोंगडे, अध्यक्ष, सत्यशोधक वारकरी महासंघ, रायगड


फोटो ओळ
पाली ः दिनेश शिर्के, पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रोहा

हभप महेश पोंगडे महाराज, अध्यक्ष, सत्यशोधक वारकरी महासंघ, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com