

पालीत डम्परचा पुन्हा धुमाकूळ
दोन दुचाकींना उडवले
पाली, ता. १४ (वार्ताहर) ः पाली शहरात ओव्हरलोड डम्परचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी (ता. १३) रात्री आगरआळी जवळ एका भरधाव डम्परने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून, अपघातावेळी दुचाकींवर कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाली शहरात गेल्या काही महिन्यांपासून डम्परमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात महावितरणचे कर्मचारी अनंत सोनवणे यांना एका भरधाव डम्परने पाठीमागून धडक दिली होती. सोनवणे यांनी प्रसंगावधान राखून गाडीवरून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले, तर जानेवारी महिन्यात ग. बा. वडेर हायस्कूलजवळ एका डम्परच्या फाळक्याची कडी तुटून लागल्याने ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे जखमी झाले होते. त्यामुळे पालीतील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. दरम्यान, प्रशासनाने ही ओव्हरलोड वाहतूक तातडीने बंद करावी, अन्यथा पालीकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी दिला आहे.
नगर पंचायतीचा ठराव धूळखात
नागरिकांच्या तक्रारीनंतर पाली नगर पंचायतीने २६ फेब्रुवारी रोजी शहरात सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कार्यवाहीची मागणीही केली होती. मात्र, कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने हा ठराव केवळ कागदावरच राहिला असल्याचे श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले आहे.
बाह्यवळण मार्ग (बायपास) कधी होणार
पाली शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी बाह्यवळण मार्ग हा एकमेव कायमस्वरूपी पर्याय आहे. मात्र, गेल्या १२-१५ वर्षांपासून हा मार्ग मंजूर होऊनही रखडला आहे. हा मार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांचा जीव असाच टांगणीला राहणार असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
फोटो ओळ,
पाली ः येथे डम्परने उडवलेली दुचाकी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.