

बल्लाळेश्वर मंदिराचा होणार कायापालट
२८.४० कोटींचा विकास आराखडा मंजूर
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे देवस्थान असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या वैभवात आता मोठी भर पडणार आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी २८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप जपण्यासोबतच भाविकांना आधुनिक सुविधा मिळणार असून, संपूर्ण पाली परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
नव्या विकास आराखड्यानुसार सध्या मंदिरासमोर अडथळा ठरणारी दुकाने, जुन्या इमारती आणि पाणपोई हटवून तो भाग पूर्णपणे खुला केला जाणार आहे. त्या ठिकाणी पायऱ्या आणि सुटसुटीत दर्शनबारी उभारण्यात येईल. यामुळे अनेक वर्षांनंतर भाविकांना बल्लाळेश्वर मंदिराचे मूळ भव्य-दिव्य रूप दुरूनच न्याहाळता येणार आहे. मंदिराचा वारसा जपण्यासाठी बांधकामात दगड, लाकूड, चुना आणि पारंपरिक धातूंचा वापर केला जाणार आहे. मंत्रालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या निधीचे अधिकृत पत्र देवस्थानला प्रदान करण्यात आले. या वेळी बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, भाजप नेत्या गीता पालरेचा, पालीचे नगराध्यक्ष पराग मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
‘या’ प्रकल्पातील प्रमुख आकर्षणे
धुंडीविनायक मंदिर : मुख्य मंदिराच्या वास्तुशैलीला साजेसे असे धुंडीविनायक मंदिराचे नूतनीकरण केले जाईल. येथील पत्र्याची छते काढून परिसर मोकळा केला जाईल.
प्रवेशद्वार : मंदिराला आता पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तीनही बाजूंनी प्रवेश कमानी असतील.
भाविकांसाठी सुविधा : अद्ययावत दर्शनरांग व्यवस्थापन, बसण्याची व्यवस्था, माहिती फलक, नवीन फरसबंदी आणि संपूर्ण परिसराचे विद्युतीकरण करण्यात येईल.
सुरक्षा : परिसरात आधुनिक अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात येणार असून ऐतिहासिक कुंडाची स्वच्छता व दुरुस्ती केली जाईल.
कार्यालयीन इमारत : प्रशासकीय कामांसाठी आरसीसी पद्धतीने नवीन कार्यालय बांधले जाईल, परंतु त्याचे बाह्य रूप मंदिराच्या पुरातन शैलीशी मिळतेजुळते असेल.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार आहे. मूळ ढाचा कायम ठेवून भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान, पाली
फोटो ओळ,
पाली ः बल्लाळेश्वर मंदिराचा कायपालाट होऊन दिसणारा आराखडा.
पाली ः जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान, पाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.