

पालीत प्राचीन मंदिरांचे जतन
एकाच फेरीत तीन देवस्थानांचे दर्शन
पाली, ता. ४ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथे श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचा नवा अध्याय सुरू झाला असून, प्राचीन श्री केदारेश्वर व श्री मारुती मंदिरांच्या जीर्णोद्धार व पुनर्विकास प्रकल्पाला नुकताच शुभारंभ झाला. सुमारे दोन कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसराचा सर्वांगीण कायापालट होणार आहे.
मधली आळी, कसबे येथील या मंदिरांच्या भूमिपूजन सोहळ्याला भक्तिमय वातावरण लाभले. देवस्थानचे अध्यक्ष अभिजीत चांदोरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी विश्वस्त, भाविक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान असल्याने येथे दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते. या मुख्य मार्गावरच श्री केदारेश्वर आणि श्री मारुती मंदिर असल्यामुळे आता भाविकांना ‘एकाच फेरीत तीन देवस्थानांचे दर्शन’ घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
सुमारे ३४० वर्षांची परंपरा असलेले श्री मारुती मंदिर हे पालीकरांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या सेवेकऱ्यांनी स्थापलेली सहा फूट उंचीची मूर्ती येथे असून, त्याचप्रमाणे प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर परिसरात विशेष आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. या वारशाचे जतन करत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प या प्रकल्पातून करण्यात आला आहे.
-----------------
पाच टप्प्यांत विकास
या पुनर्विकास आराखड्यात पाच टप्प्यांमध्ये कामे केली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात केदारेश्वर (शंकर) मंदिराचा संरचनात्मक जीर्णोद्धार करून मूळ वास्तुशिल्पीय वैभव पुनर्स्थापित केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी सभागृह व खोल्यांसह बहुउद्देशीय इमारत उभारली जाईल.
तिसऱ्या टप्प्यात परिसराचे सुशोभीकरण, मोकळी जागा आणि पवित्र कुंड तयार केले जाईल.
चौथ्या टप्प्यात दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र सुसज्ज मंडप उभारण्यात येईल.
अंतिम टप्प्यात श्री मारुती मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाणार आहे.
------------
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि लोकसहभागाचे आवाहन
या प्रकल्पासाठी ‘मिल्यू आर्किटेक्चर’ या तज्ज्ञ संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात आहे. मंदिराचे पावित्र्य जपूनच हा विकास साधला जाणार आहे. ‘हा प्रकल्प म्हणजे केवळ बांधकाम नसून श्रद्धेचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्याची संधी आहे,’ असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
---------
हा प्रकल्प पाच टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शंकर मंदिराचे मूळ वैभव परत मिळवून देण्यावर आमचा भर आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बहुउद्देशीय इमारत, सुशोभीकरण आणि मारुती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला जाईल.
- अभिजित चांदोरकर, अध्यक्ष, मारुती देवस्थान विश्वस्त संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.