पावसाअभावी ताम्हिणी घाट व देवकुंड ओस

पावसाअभावी ताम्हिणी घाट व देवकुंड ओस
Published on

पावसाअभावी ताम्हिणी घाट व देवकुंड ओस
सीक्रेट पॉइंट ‘अंधारबन’ व ‘खजिना ट्रेक’वर शांतता
पाली, ता. २२ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील देवकुंड, खजिना व अंधारबन ट्रेक, धबधबे आणि समृद्ध निसर्गामुळे दरवर्षी पावसाळ्यात देशभरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा उलटूनही रायगड जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन न झाल्याने येथील पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे.
पावसाअभावी सह्याद्रीच्या डोंगररांगांवरील धबधबे कोरडे असून, धुक्याची चादर आणि हिरवाईचे मनमोहक दृश्य अद्याप दिसत नाही. त्यामुळे देवकुंड, खजिना आणि अंधारबन परिसरात पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे.
भिरा, पाटणूस, विळे आणि रवाळजे परिसरातील नैसर्गिक सौंदर्यही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेले देवकुंड आणि दुर्मिळ गिधाडांसाठी प्रसिद्ध असलेला खजिना ट्रेकही सध्या ओस पडला आहे. पाऊस लवकर सुरू झाल्यासच या परिसरातील पर्यटनाला पुन्हा गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक आणि निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.

चौकट
स्थानिक व्यवसायांना फटका
पावसाळ्यात येथे लाखो पर्यटक येत असल्याने स्थानिक हॉटेल व लॉज व्यावसायिक, छोटे दुकानदार, गाईड, विक्रेते, यांना मोठा रोजगार मिळतो. विशेष म्हणजे आदिवासी बंधू भगिनींना चांगला रोजगार मिळतो. तसेच ग्रामपंचायतींना पर्यटन कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करता येतो. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने या सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या धंद्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या ठिकाणी तब्बल अडीचशे ते तीनशे गाईड आहेत. त्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.

कोट
देवकुंड, ताम्हिणी घाट, अंधारबन ट्रेक, सीक्रेट पॉइंट या ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांची पावले थबकली आहेत. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासींचा रोजगारही हिरावला आहे.
आंदेश दळवी, माजी उपसरपंच व व्यावसायिक, पाटणूस

कोट
ताम्हिणी घाटातील अप्रतिम निसर्ग आणि फेसाळणारे धबधबे मनाला प्रसन्न करतात. दरवर्षी आम्ही या काळात मित्रपरिवारासह येतो. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने निसर्गाचे ते रूप पाहायला मिळाले नाही आणि हिरमोड झाला आहे.
गिरीश म्हात्रे, पर्यटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com