

शिक्षक भरतीत सहा तालुके वंचित
३५१ शिक्षकांची भरती; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न कायम
पाली, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे मागील आठवड्यात ३५१ उपशिक्षक पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली. यात मराठी माध्यमाचे ३४०, तर उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक मिळाले. दरम्यान, उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि सुधागड या सहा तालुक्यांना भरती प्रक्रियेत वगळण्यात आल्याने शिक्षकांच्या उपलब्धतेचा प्रश्न कायम आहे.
जिल्ह्यात अद्याप मराठी माध्यमाची १,१३९ आणि उर्दू माध्यमाची ७८ पदे रिक्त आहेत. नव्या भरतीनंतरही सुधागडमध्ये ५४, खालापूरमध्ये ३२, पेणमध्ये ९३, कर्जतमध्ये ७२ आणि उरणमध्ये ४० पदे रिक्त आहेत. या सहा तालुक्यांतील जवळपास २० शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या शाळांमध्ये अध्यापनासाठी लगतच्या केंद्र शाळांमधून किंवा तात्पुरत्या व्यवस्थेतून शिक्षक पाठवले जात आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
प्राधान्याची मागणी
शिक्षक भरती करताना सर्व तालुक्यांचा समतोल विचार करून शून्य शिक्षकी शाळांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. खांडपोली येथील सरपंचांनी कामथेकरवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नियुक्त करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक न मिळाल्यास त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे वाघोशीचे माजी सरपंच दीपक पवार यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले, की मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असलेल्या तालुक्यांत प्राधान्याने भरती केली असून, शून्य शिक्षकी शाळांमध्येही शिक्षक देण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांतील जागा दुसऱ्या टप्प्यात तातडीने भरल्या जातील. काही जागा समायोजनानेही भरल्या जात आहेत. मात्र सुधागडमध्ये एकही शिक्षक मिळालेला नाही. तालुक्यात ५४ पदे रिक्त असून, त्यामुळे शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर ताण येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.