

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी केंद्रासाठी सामंजस्य करार
२७ हजार कोटींची गुंतवणूक; प्रत्यक्ष १५ हजार, अप्रत्यक्ष ७५ हजार रोजगारांची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : जिल्ह्यातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहा’ला (शिपबिल्डिंग क्लस्टर) मोठी गती मिळाली आहे. या समूहात अत्याधुनिक जहाजबांधणी केंद्र उभारण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात मंगळवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
करारानुसार माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून दिघी येथे दरवर्षी किमान २० लाख सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. त्याचबरोबर जहाजबांधणी क्षेत्रातील देशांतर्गत क्षमता वाढण्यास आणि सागरी औद्योगिक क्षेत्राला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या वेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन, तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि सक्षम देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था उभारण्याचा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अनुभव आहे. दिघी येथे आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा उभारण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी सांगितले. त्यांनी या उपक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
‘मेरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७’
महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ‘एनशिपएमएल’ या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत आहे. ‘मेरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांनाही हा प्रकल्प पूरक ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, प्रत्यक्ष १५ हजार आणि अप्रत्यक्ष ७५ हजार अशा एकूण ९० हजार रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
सेवा पुरविणाऱ्या उद्योगांना चालना
दिघीतील प्रकल्पामुळे आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच त्याला पूरक औद्योगिक व पुरवठा साखळी परिसंस्थाही विकसित होणार आहे. जहाजबांधणीसाठी आवश्यक अभियांत्रिकी, उपकरणे, सुटे भाग आणि विविध सेवा पुरविणाऱ्या उद्योगांना यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासह कुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.