

दुर्गम शाळेचा कायापालट
सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य; स्मिता जगताप यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
पाली, ता. १६ (वार्ताहर) : दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळेत पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सुधागड तालुक्यातील रासळ आदिवासीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका स्मिता सुजित जगताप यांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच महाड येथे प्रदान करण्यात आला. पालकमंत्री भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
स्मिता जगताप यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. काही वर्षांपूर्वी रासळ आदिवासीवाडी शाळेची इमारत गळकी होती. स्वच्छतागृह व किचन शेड नादुरुस्त होते. परसबागेचा अभाव आणि पालकांचे स्थलांतर यामुळे शाळेची पटसंख्याही कमी झाली होती. २०२३ मध्ये त्यांनी शाळेचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकसहभागातून तसेच स्वतःच्या प्रयत्नांतून शाळेचा कायापालट सुरू केला.
शाळेत सुसज्ज स्वच्छतागृह, किचन शेड, आकर्षक वर्गखोल्या, सोलर पॅनल, एलईडी टीव्ही आणि वॉटर फिल्टर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वी जिल्हा परिषद शाळा वावे येथे कार्यरत असताना केवळ पाच विद्यार्थी असलेल्या शाळेची पटसंख्या २७ पर्यंत वाढविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गुणवत्तावाढीवर भर
सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेसाठी कृतीद्वारे शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थी आवडीने शिकू लागले. शालेय पोषण आहारात नावीन्य आणण्यासोबतच रक्षाबंधन, दहीहंडी, वृक्षारोपण, वाचन कट्टा आणि वर्षा सहल यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल झाला.
स्थलांतराला बसला आळा
शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे स्थलांतर पूर्णपणे थांबले. या प्रयत्नांमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय व्यक्तिमत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शाळेने सलग दोन वर्षे तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत यश संपादन केले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास त्यांचे शिक्षणातील सातत्य कायम राहू शकते, हे या उपक्रमातून दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.