नवघरमध्ये भोंडल्यातून जलसंवर्धनाचा संकल्प

नवघरमध्ये भोंडल्यातून जलसंवर्धनाचा संकल्प
Published on: 

नवघरमध्ये भोंडल्यातून जलसंवर्धनाचा संकल्प
हस्त नक्षत्रात पावसासाठी प्रार्थना; लोकगीतांनी खुलला सोहळा
पाली, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा, नवघर येथे नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. १६) पारंपरिक भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक परंपरेचे जतन करीत विद्यार्थिनींनी पाणी बचतीचा संकल्प केला. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत जलसंवर्धनासाठी प्रार्थना करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत हत्तीचे आकर्षक रेखाटन करून सुंदर रांगोळी साकारली. नटूनथटून आलेल्या विद्यार्थिनी, शिक्षिका आणि माता-पालकांनी पारंपरिक पद्धतीने हत्तीचे पूजन केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत भोंडल्याची विविध लोकगीते गायली.
हस्त नक्षत्रात पावसाचा अभाव जाणवत असल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई दूर व्हावी आणि जलसंवर्धनाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. परंपरेतून निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षिका वृषाली गुरव, शिक्षक राजेंद्र अंबिके, शिक्षिका अनुजा माने आणि रुपाली लेंडवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

डब्यातील खाऊने वाढवला आपुलकीचा गोडवा
शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बैकर यांनी भोंडल्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि निसर्गाशी जोडलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर ‘ओळखा पाहू, माझ्या डब्यात काय आहे?’ हा मनोरंजक खेळ घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी घरून आणलेला विविध प्रकारचा खाऊ एकत्र करून सर्वांना वाटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सामाजिक सलोखा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली.

फोटो ओळ, पाली : जिल्हा परिषदेच्या नवघर शाळेतील भोंडल्याचा कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्साही सहभागाने साजरा झाला. (छायाचित्र : अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com