जनावरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न रायगडावर नैसर्गिक आपत्तीची मालिका दुष्काळ व अवकाळीचा तडाखा

जनावरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न रायगडावर नैसर्गिक आपत्तीची मालिका दुष्काळ व अवकाळीचा तडाखा
Published on: 

जनावरांच्या वैरणीचा तुटवडा
दुष्काळानंतर अवकाळीचा फटका; भातासह पेंढाही सडल्याने पशुपालक संकटात
पाली, ता. ९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, दुष्काळानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भातपिकाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने उत्पादनात घट झाली. त्यात काढणीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेला भात आणि पेंढा भिजून खराब झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसमोर आता केवळ अन्नधान्याचाच नव्हे, तर जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुहेरी नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला भातपिकाची स्थिती समाधानकारक होती, मात्र सप्टेंबरपासून पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. भाताच्या दाण्यांत भर पडण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याअभावी दाणे व्यवस्थित भरले नाहीत. त्यामुळे उभे पीक पोचट राहून उत्पादन घटले. या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काढणीच्या काळात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने कापून बांधून ठेवलेले भाताचे भारे भिजले, तर वाऱ्यामुळे उभे पीक आडवे झाले. भात काळा पडल्याने त्याच्या गुणवत्तेवर आणि बाजारभावावरही परिणाम झाला. पेंढा भिजून सडल्याने जनावरांसाठी साठवलेली वैरणही वाया गेली.

पर्यायी खाद्याचा आर्थिक भार
शेतकरी शरद गोळे यांनी सांगितले की, खाण्यासाठी ठेवलेला भात खराब झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी पेंढा उपलब्ध नसल्याने पशुपालकांना सरकी, शेंगदाणा पेंड आणि सोयाबीन ढेप यांसारखे महागडे पर्याय खरेदी करावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवरील खर्चाचा भार वाढणार असून दुग्धव्यवसायही अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे शेतकरी राम तुपे यांनी सांगितले.

चारा छावण्यांची गरज
शेतीचे नुकसान आणि पशुधनाच्या चाऱ्याची टंचाई या दोन्ही संकटांतून बाहेर पडण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करावेत, नुकसानभरपाई द्यावी आणि आवश्यक ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.