पाणीटंचाईचे सावट: खारघर, तळोजावासीयांना गणेशोत्सवात बाप्पा पावणार का? सिडकोचे प्रयत्न सुरू, पालिका प्रशासनाकडून नकार

पाणीटंचाईचे सावट: खारघर, तळोजावासीयांना गणेशोत्सवात बाप्पा पावणार का? सिडकोचे प्रयत्न सुरू, पालिका प्रशासनाकडून नकार
Published on

खारघर-तळोजाला गणेशोत्सवात पाण्याची चिंता
अतिरिक्त १० एमएलडीसाठी सिडकोचा आग्रह
​खारघर, ता. ११ (बातमीदार) : ऐन गणेशोत्सवात खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांसमोर तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सणासुदीच्या दिवसांत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी सिडकोच्या उच्च अधिकाऱ्यांकडून नवी मुंबई पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, मात्र तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींमुळे अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी बाप्पा खारघर आणि तळोजावासीयांच्या हाकेला धावून येणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खारघर आणि तळोजा परिसरातील विविध सेक्टरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दररोज पालिकेच्या किंवा खासगी टँकरवर हजारो रुपये खर्च करून अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच गणेशोत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ​या परिस्थितीवर मात करण्यासाठी सिडको प्रशासनाने नवी मुंबई पालिकेकडे वसाहतींसाठी अतिरिक्त १० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. ​एकीकडे उत्साहात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना, दुसरीकडे कोरड्या नळांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सिडको अधिकारी आणि पालिका प्रशासन शेवटच्या क्षणी काही तडजोड करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देतात की नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच उत्सव साजरा करावा लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सिडकोकडून प्रयत्न सुरू
​येत्या १४ तारखेपासून लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. सणाच्या काळात नागरिकांना पाण्याची अडचण भासू नये, म्हणून सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु नवी मुंबई पालिकेच्या ताब्यातील मोरबे धरणातील पाणीसाठ्याची पातळी खालावल्याने आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन पाहता सध्या अतिरिक्त पाणी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. यासंदर्भात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी आणि मुख्य अभियंता शिला करुणाकरण यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com