

खारघरच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा!
नर्सरी, फळ व खाद्यविक्रेत्यांचे पदपथांवर साम्राज्य
खारघर, ता. ९ (बातमीदार) : शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. रस्ते आणि पदपथांवर वाढलेल्या अनधिकृत व्यावसायिकांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांना थेट मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. पालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक समीर कदम यांनी मंगळवारी (ता. ६) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत केली.
खारघरमधील उत्सव चौकाकडून टाटा रुग्णालयाकडे जाणारा नाला आणि पदपथ, रस्त्यावर नर्सरी चालक तसेच फळविक्रेत्यांनी कब्जा केला आहे, तर कोपरा पुलावरून सेक्टर १५ ते १९कडे जाताना डी-मार्टकडून पेट्रोलपंपाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला खाद्यविक्रेत्यांनी रस्ता आणि पदपथावर अतिक्रमण केले आहे. या परिसराला आता अनधिकृतपणे खाऊ गल्लीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या कडेला उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जात असून, काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी, विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आहेत का हे तपासावे आणि घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, खारघरमधील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने मनुष्यबळ वाढविणे आवश्यक असून प्रत्यक्ष परिणाम याचेही मूल्यमापन झाले पाहिजे. आज अतिक्रमण हटवायचे आणि उद्या त्याच ठिकाणी पुन्हा उभे राहायचे, असे सुरू राहणार असेल तर पालिकेच्या कारवाईचा उपयोग काय? यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमित पाहणीची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे समीर कदम यांनी सांगितले.
कारवाई पूर्वी अतिक्रमणधारकांना फोन?
अतिक्रमणविरोधी पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच काही फळविक्रेते, खाद्यविक्रेते आणि दुकानदारांना कारवाईची माहिती मिळत असल्याचा दावा समीर कदम यांनी केला आहे. अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच अतिक्रमणधारकांना सावध कोण करते, कारवाईची माहिती बाहेर कशी जाते, पालिकेतील कोणाचा अतिक्रमण धारकांशी संपर्क आहे का, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.