

खारघरमध्ये यंदा दसऱ्याची रंगत वाढणार
दोन मंडळांमध्ये रावण दहनाची चढाओढ; ७० ते ७५ फुटांच्या प्रतिकृती उभारण्याचे नियोजन
खारघर, ता. १८ (बातमीदार) : विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त खारघर शहरात यंदा रावण दहनाच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शहरातील दोन प्रमुख मंडळांकडून तब्बल ७० ते ७५ फूट उंचीच्या रावणाच्या महाकाय प्रतिकृती उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खारघरमध्ये रावण दहनाच्या भव्यतेवरून दोन प्रमुख आयोजकांमध्ये मोठी चुरस रंगणार असून, हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
खारघर कॉलनी फोरमच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून दसऱ्यानिमित्त सुमारे ५५ फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येत होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, मात्र यंदा भाजपप्रणीत मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रवीण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘खारघरची आई-नमो गरबा’ नवरात्रोत्सवातही रावण दहनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा रावण दहनाच्या उंचीवरून दोन्ही मंडळांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही मंडळांच्या वतीने रावणाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी विशेष तयारी सुरू आहे. आकर्षक रचना, देखणी सजावट आणि रोषणाईने सजलेल्या या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेतआहेत. रावणाच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रावण दहनाच्या या चुरशीमुळे खारघरमधील दसरा उत्सवाची रंगत यंदा आणखी वाढणार आहे. खारघरसह नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना या भव्य सोहळ्याची उत्सुकता लागली असून, दसऱ्याच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सुरक्षा व गर्दीच्या नियोजनावर भर
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडे केलेल्या विचारणा केली असता, यंदा ७० ते ७५ फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिकृती उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील रावण दहनाच्या कार्यक्रमांच्या तुलनेत खारघरमधील सोहळा अधिक भव्य ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही मंडळांकडून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तयारी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.