
शिवमंदिरात महापूजा, काकडआरती
खोपोली, ता. १८ (बातमीदार) ः खोपोलीचे ग्रामदैवत व पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मध्यरात्री साडे बारा वाजता शिवलिंगाची महापूजा व पहाटे पाच वाजता काकडआरती करून खोपोलीतील भगवान वीरेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त आजूबाजूच्या गावातील पालख्या वीरेश्वर मंदिरात दाखल झाल्या होत्या. खोपोलीत बाजारपेठेला लागून असलेले पुरातन भैरवनाथ मंदिर, भानवज-मोगलवाडी येथील भव्य बारा जोतिर्लिंग शंकर मंदिर, शिळफाटा येथील ऐतिहासिक शंकर मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
................
पोलादपूरामध्ये टेकडीवर शिवभक्तांचे श्रद्धास्थान
पोलादपूर (बातमीदार) ः पोलादपूरातील निसर्गरम्य गिरी शिखरावरील ‘महादेवाचा डोंगर’ देवस्थान अखंड शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. शनिवारी सकाळी भाविकांनी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. या वेळी महाआरती व विधिवत पूजा करण्यात आली. पोलादपूरातील शिवभक्तांनी महादेव डोंगर येथे पाऊलवाट साफसफाई, पाऊलवाटेच्या कडेने झाडांचे संगोपन, परिसराची स्वच्छता रंगरंगोटी व सुशोभीकरण केले होते.