खंडाळा घाटातील अवजड वाहतूक बंद
खोपोली , ता. २३ (बातमीदार) ः गोरेगाव येथील ढोल-पथकाची बस १५ एप्रिल रोजी खंडाळा घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचे बळी गेले तर २९ जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर घाटातील खंडाळा ते खोपोलीसाठी एकेरी मार्गावरून नियमबाह्य अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. अन्य वाहनांना उतरण्यासाठी शीळफाटा मार्गे यावे लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट घेत घाटातील धोकादायक वळणे व उताराची माहिती घेत संबंधित यंत्रणेला यात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रस्ते विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, महामार्ग प्राधिकरण, परिवहन विभाग व महामार्ग वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालापूर टोल नाका ते खंडाळा तसेच खंडाळा ते खोपोली घाट रस्त्याची पाहणी केली.
अपघातग्रस्त क्षेत्र, तीव्र उतार, वळण, एकेरी मार्गाची काटेकोर अंमलबजावणी या बाबत तातडीने उपाययोजना राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. घाटातील खंडाळा ते खोपोलीसाठी एकेरी मार्गावरून अवजड वाहतूक बंद केली आहे. या मार्गावरून केवळ दुचाकी व ऑटो रिक्षा जाऊ शकते. अन्य वाहनांना उतरण्यासाठी शीळफाटा मार्गे यावे लागणार आहे. तसेच तीव्र वळणे, उतार व ज्या ठिकाणी हा भीषण अपघात घडला, त्या ठिकाणी तातडीने पक्के बॅरिगेट्स उभारण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादा याबाबत वाहतूक पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी सुरू आहे.
द्रुतगती मार्गावर भीषण अपघात घडल्यावर यंत्रणा जागी झाली असून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. यातील अनेक बाबी यापूर्वीच होण्याची गरज होती. महामार्गालगत अद्ययावत रुग्णालय लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
- गुरुनाथ साठेलकर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे कार्यकर्ते
वाहतूक नियमांचे पालन व एकेरी वाहतुकीबाबत अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. वाहन चालकांनीही खंडाळा घाट तसेच द्रुतगती मार्गावरून वाहने चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
- योगेश भोसले, निरीक्षक, खंडाळा घाट पोलिस
खोपोली : खंडाळा घाट रस्त्यावर बॅरिगेट्स लावले आहेत.
.............
बस दुर्घटनेतील दोषींवर गुन्हा दाखल करा
खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः द्रृतगती मार्गावरील तीव्र उतारावर सुरक्षा कठडा नसल्याने बस दरीत कोसळून बोर घाटात भीषण अपघात झाला. या अपघातप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. खोपोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांना आपच्या वतीने याबाबत लेख पत्र देण्यात आले आहे.
अपघातानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ सुरक्षा कठडे लावण्यात आले. हेच कठडे जर आधी लावले असते, तर कदाचित दुर्घटना टळली असती. अजूनही बोरघाटात बऱ्याच ठिकाणी संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
बोरघाटात होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीकडून योग्य खबरदारी घेतली जात नाही. अपघात घडल्यावर त्वरित मदत, उपचार मिळणे आवश्यक आहे. यावर त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- डॉ. शेखर जांभळे, तालुकाध्यक्ष, आप, खालापूर
अपघातानंतर महामार्गावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- शिरीष पवार, वरिष्ठ निरीक्षक, खोपोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

