धाकटी पंढरीतील पेशवेकालीन तलावाची दुरवस्‍था

धाकटी पंढरीतील पेशवेकालीन तलावाची दुरवस्‍था

खोपोली, ता. ६ (बातमीदार)ः कोकण आणि मावळ प्रांत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे विभागला असला तरी पूर्वी बिकट वाट शोधत दोन्ही प्रांतात लोकांचे येणे-जाणे सुरू होते. या प्रवासादरम्यान तहान भागवण्यासाठी खालापूर तालुक्‍यात ठिकठिकाणी जलस्‍त्रोत तयार केल्‍याचे दिसून येत आहे. खोपोली शहरातल्या श्री वीरेश्वर देवस्थानाजवळचा पेशवेकालीन कंकण तलाव यापैकीच एक. अत्यंत सुसज्ज आणि वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेला कंकण तलाव इतिहासाची साक्ष देत आजही भक्कमपणे उभा आहे. मात्र अजून एक तलाव असा आहे की, ज्याची तुलना कंकण तलावासोबत करता येईल, तशाच जडणघडणीचा, चौकोनी स्वरूपाच्या बांधणीचा, इतिहासकालीन तलाव खालापूर तालुक्यातल्या सारसन आणि ताकई गावादरम्यान असून त्‍याच्या देखभाल दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे.
खालापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धाकटी पंढरी नावाने प्रसिद्ध असलेल्या देवस्थानाच्या डोंगर पायथ्याशी खोपोली-पेण रस्त्यालगत ऐतिहासिक दगडी बांधणीचा चौरस आकाराचा हा तलाव आहे. तलावाची बांधणी पेशवेकालीन कंकण तलावासारखीच घडीव दगडांची आहे. ई. स. १७४० च्या दरम्यान तलावाची निर्मिती झाल्याची ढोबळ माहिती आहे.
साधारण ११५ फूट लांब, ६६ फूट रुंद आणि १५ फूट खोल असलेल्‍या पेशवेकालीन तलावात उतरण्यासाठी पूर्वेच्या बाजूस दगडी पायऱ्या आहेत तर आत उतरताना उजव्या बाजूला एक चौकोनी शिलालेख असून त्यावर मोडी किंवा संस्कृत सदृश लिखाण आहे. तलावाची पश्चिम आणि उत्तर बाजूची भिंतीची पडझड झाली आहे. कडक उन्हाळ्यात तलावात पाणीसाठा असतो. तलावाशेजारी राहणारे खोपोली नगरपरिषदेचे निवृत्त अभियंता रामकृष्ण शहाणे, सचिन शहाणे कुटुंबीय तलावाची देखरेख करीत असून त्‍याच्या संवर्धनासाठी प्रयत्‍न करीत आहेत. त्यांनी पदरमोड करीत विहिरीची पडलेली बाजू बांधली असती तरी या ऐतिहासिक तलावाच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. खोपोलीतील निसर्ग मित्र गुरुनाथ साठेलकर, जगदीश मरागजे, पर्यावरण प्रेमी रवींद्र कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, क्रीडा प्रशिक्षक समीर शिंदे आणि अमित विचारे हे या तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातले असून भारतीय पुरातत्त्व विभागाशी लवकरच संपर्क करणार असल्याचे सांगितले आहे.

खोपोली : धाकटी पंढरीच्या पायथ्याशी पेशवेकालीन तलाव दुर्लक्षित बनला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com