एमएसआरडी ने मारले पण अवकाळी पावसाने तारले

एमएसआरडी ने मारले पण अवकाळी पावसाने तारले

महामार्गाच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष
एमएसआरडीसी-आयआरबीमध्ये हस्‍तांतरावरून वाद

खोपोली, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर ते खोपोली बोरघाट पायथा अशा आठ किलोमीटर रस्‍त्‍याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र एमएसआरडीसी व आयआरबी कंपनीच्या वादात खालापूर ते शासकीय दूध डेअरी या पाच किमी अंतरामधील रस्ताच्या देखभाल दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष झाल्‍याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दुभाजकांच्या मधोमध लावलेली झाडेही सुकली होती, मात्र अवकाळीने त्‍यांना जीवदान मिळाले असून पुन्हा बहरू लागली आहेत.
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर खालापूर ते खोपोलीदरम्‍यान खड्डेमय झाला आहे. मार्गाच्या दुरुस्‍तीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले आहेत, मात्र तरीही समस्‍या जैसे थे आहेत. दुभाजक उभारतानाही योग्‍य नियोजन न केल्‍याने वारंवार अपघात घडतात. खालापूर-खोपोली अंतरावर कुठलीही दिशादर्शक फलक नाहीत, रस्‍त्‍यालगत साईडपट्ट्या नाहीत, लेनचे मार्किंगही नसल्‍याने वाहनचालकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते.
मार्गालगत चहाटपरी, बांधकाम साहित्य, हार्डवेअर, चायनीज सेंटर आदींनी अतिक्रमण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मार्गालगत मोजणी करण्यात आली. मात्र अद्याप कारवाई न झाल्‍याने अतिक्रमण वाढतच आहेत. खोपोली-खालापूर मार्ग ताब्यात घेण्यास आयआरबी कंपनी नकार देत आहे, तर इगल इन्फ्रा कंपनीने, आम्ही मार्ग बनवून दिला आहे, पुढची जबाबदारी आमची नसल्‍याची भूमिका घेतली आहे.

खालापूर ते शिळफाटा, खोपोली मार्गावरील माती ठिसूळ, भुसभुशीत‍ असल्याने रस्‍ता वारंवार उखडला जातो. या दरम्‍यान सिमेंट कॉँक्रिट रस्ता बनवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लवकरच हा मार्ग खड्डे मुक्त होईल.
- डी. ई. काजरेकर, अभियंता, रस्‍ते विकास महामंडळ

एमएसआरडीसीचे पथक खालापूरमध्ये येऊन मार्गाची पाहणी करणार आहे. त्‍यानंतर मार्ग हस्तांतराबाबत चर्चा होईल. मात्र हा मार्ग जोपर्यंत सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत आयआरबी मार्ग हस्‍तांतरित करून घेणार नाही. मार्गालगतच्या अतिक्रमणचेही सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. हस्तांतरण होताच यावर कारवाई करण्यात येईल.
- अनिल धायगुडे, अधिकारी, आयआरबी


मुंबई पुणे जुन्या महामार्गाचे खालापूर ते खोपोली, बोरघाट पायथ्‍यापर्यंत रुंदीकरणाच्या कामासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्‍यास दोन वर्षे विलंब झाला आहे. खोपोली शिळफाटा ते वरची खोपोली कमानीपर्यंत रुंदीकरण झाले असले तरी त्‍यासाठी जवळपास ५० झाडे तोडण्यात आली आहेत. त्याबदल्यात ठेकेदाराने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावावीत, अशी अट असताना ही झाडे अद्याप लावण्यात न आल्‍याचा नागरिकांचा आरोप आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ठेकेदाराने महामार्गावरील दुभाजकामध्ये झाडे लावली, मात्र पाण्याअभावी ती सुकून गेली आहेत.

खोपाली : महामार्गातील दुभाजकात लावलेली झाडे सुकली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com