खंडित विजेमुळे खोपोलीकर आक्रमक

खंडित विजेमुळे खोपोलीकर आक्रमक

खोपोली, ता. २ (बातमीदार)ः खालापूर तालुका हा औद्योगिक नगरी म्हणून विकसित होत आहे, मात्र काही महिन्यांपासून खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात वीज पुरवठ्यात येणाऱ्या सततच्या व्यत्ययामुळे नागरिकांचा संताप होत आहे. खोपोली-खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून सोमवारी (ता.१) खोपोली महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
दर मंगळवारी देखभाल-दुरुस्‍तीसाठी महावितरणकडून शटडाऊन घेतले जाते. तर गेले तीन आठवडे सात तासांहून अधिक शटडाऊन घेऊनही सायंकाळी वीज जाते. २९ जूनला सायंकाळी सहा वाजेपासून मध्यरात्री एकपर्यंत शहरातला वीज पुरवठा बंद होता. रविवारीही वारंवार बत्ती गुल झाल्‍याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला.
महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सात दिवस अखंडपणे वीज देण्याची लेखी हमी या वेळी मागण्यात आली. यावर उपकार्यकारी अभियंता सतीश गढरी यांनी, पायाभूत समस्या दूर करण्यासाठी आणखी तीन महिने तरी लागतील, असे सांगून हमी देण्यास टाळले. त्यामुळे आक्रमक झालेल्‍या नागरिकांनी जो पर्यंत वीज पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत वीजबिले न भरणार नसल्‍याचा इशारा देत वीजवितरण कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी डॉ. शेखर जांभळे यांच्या माध्यमातून खोपोली शहर व तालुक्यांतील प्रश्नांसाठी जनतेचा पुढाकार घेऊन खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी राजेंद्र फक्के, सुभाष पोरवाल, अजित जैन, अशोक ठकेकर, महेश जाखोटिया, दिवेश राठोड, प्रशांत साठे, जुझार खोपोलीवाला आदी उपस्‍थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या बेजबाबदारपणाची शिक्षा शहरातील नागरिकांना मिळत आहे. सक्तीची बिल वसुली करणाऱ्या महावितरणने आपल्‍या कार्यपद्धतीत आठ दिवसांत सुधारणा न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. यामुळे वाद अथवा तेढ निर्माण झाल्‍यास त्‍याची सर्वस्वी महावितरणच जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक व्यापारी सुभाष पोरवाल व राजेंद्र फक्के यांनी दिला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे लहान व मध्यम कारखानदारी संपुष्टात येण्याची भीती व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

वीज वितरणच्या मनमानी कारभाराबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा व तक्रार करण्यासाठी माजी नगराध्यक्ष व ज्‍येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक मनेश यादव, मोहन औसरमल, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कार्यकारी अभियंता वीजवितरण, ऊर्जा मंत्री यांची भेट घेऊन खोपोलीतील वीजवितरणातील समस्‍या मांडणार असून त्‍यात तातडीने सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्‍याचे मसूरकर यांनी सांगितले.

खोपोली : वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या विरोधात खोपोली वीजवितरण कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com