खोपोली - खालापूरात मान्सूनपूर्व कामांची लगबग, नाका कामगारांना मोठी मागणी
मॉन्सूनपूर्व कामांना वेग
नाका कामगारांना मोठी मागणी
खोपोली, ता. २४ (बातमीदार) ः आठवडाभरापासून सुरू असलेला पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर खालापूर-खोपोलीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरू असून, त्यासाठी नाका कामगारांना मोठी मागणी आहे. कमीत कमी ५०० ते ६०० रुपये मजुरी मिळत त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.
नगरपालिकाकडून गटारी व नालेसफाई मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांकडूनही मशागतची कामे, बांधकाम क्षेत्राकडून सिमेंटसह इतर किमती साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरते छत, वीटभट्टीवर ताडपत्रीचे आच्छादन, नागरिकांकडून घरांच्या छतांची डागडुजी आदी कामांची लगबग सुरू आहे. विविध सरकारी यंत्रणाकडून खड्डे बुजवण्याची कामे, रस्त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढणे, महावितरणकडून फांद्यांची छाटणी, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा आवळणे आदी कामे वेगाने सुरू आहेत.
खोपोली शहरात नाका कामगार उपलब्ध होण्याची दोन ठिकाणे आहेत. दीपक चौक बाजारपेठ, खोपोली व शिळफाटा इंदिरा चौक येथे मोठ्या प्रमाणावर नाका कामगार सकाळी ७ ते ९ च्या सुमारास जमा होतात. यात सामान्य मजूर, गवंडी, मिस्त्री, प्लंबर, फिटर आदी क्षेत्रातील कुशल कामगारांचा समावेश असतो. सामान्य मजुरी करणाऱ्या पुरुष कामगाराला ५००-६०० व महिला कामगाराला ४००-५०० तर कुशल कामगारांसाठी ७५० रुपयांपासून १००० पर्यंत मजुरी मिळते.
खोपोली शहरातील नालेसफाई व गटारी स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मॉन्सूनपूर्वीची अन्य कामे व डागडुजीची कामेही वेगाने सुरू आहेत.
- डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली
पावसाळी हंगामात अन्न धान्य, कडधान्ये, डाळी, कांदे व लसूण आदी आवश्यक वस्तूचे बाजारभाव वाढतात. तसेच चांगल्या वस्तू मिळतील याची खात्री नसते. म्हणून पावसाळी हंगामात पुरेल एवढा आवश्यक साठा करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
- विजया पाटील, गृहिणी, खोपोली
खोपोली : शहरात नालेसफाईची कामे सुरू आहेत.
.........................
रोह्यात नाल्याला पडले भगदाड
रोहा, ता. २४ (बातमीदार) ः काही दिवसांपासून डोंगरमाथ्यावर बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील सोनारआळी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराला लागून असलेल्या नाल्याला भगदाड पडले. नाल्यातील पाणी लोकवस्तीत शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
सोनार आळीतील वरचा मोहल्ल्यात जुना नैसर्गिक नाला लक्ष्मीनारायण मंदिराच्या संरक्षण भिंती लगत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने साऱ्यांची तारांबळ उडाली होती. डोंगरमाथ्यावर पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नाल्याला भगदाड पडल्याने नाल्यातील पाणी लोकवस्तीत शिरले व स्थानिकांचे मोठे नुकसान झाले. घरातील वस्तू खराब झाल्या. नाल्यातील घाण पाणी घरात शिरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. घटनेची माहिती समजताच, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके, माजी गटनेते महेंद्र गुजर, आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर, श्रीनिवास पाटील आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच लवकरात लवकर नाल्याची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले.
लवरकच आरसीसी नाला बांधणार
शहरातील सोनारआळीत जुना नैसर्गिक नाला आहे. डोंगरमाथ्यावरून आलेल्या पावसाच्या पाण्याचा वेग असल्याने नाल्याला भगदाड पडले आहे. हा नाला कमकुवत असून, सद्यःस्थितीत नाल्याची डागडुजी केली जाईल. पावसाळ्यानंतर मात्र या ठिकाणी नवीन आरसीसी नाला बांधण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी दिले आहेत.
रोहा : सोनार आळीतील नाल्याला भगदाड पडले.
------
बंदिस्त नाल्यांमुळे पूरसदृश परिस्थिती
नगरपालिकेकडून कारवाईचा बडगा
रोहा, ता. २४ (बातमीदार)ः तास-दोन तासाच्या पावसातच शहरातील आडवी बाजारपेठ आणि मुख्य बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा निचरा न झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजारपेठेजवळ राहणारे रहिवासी तसेच काही व्यापाऱ्यांनी गटार आणि नाल्यांवर अतिक्रमण करून नाले आणि गटार बंदिस्त केली आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या सफाई कामगारांना येथील गटारे, नाले साफ करता येत नाही. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. ही वस्तुस्थिती समोर येताच नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारून गटार आणि नाल्यावरील अतिक्रमण हटवले आहे.
शहरातील बोरी गल्ली, लाला भगवानजी हॉटेलपासून ते फिरोज टॉकीजपर्यंत नाल्यावर पक्के बांधकाम तसेच लादी टाकून बंदिस्त करण्यात आले होते. त्यामुळे वर्षानुवर्षे त्यांची सफाई झाली नव्हती. त्यामुळे तीन दिवसांच्या पावसातच आडवी बाजारपेठ आणि मुख्य बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी, नाल्यावरील बांधकाम हटवण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.
नालेसफाईत अडचणी
रोह्यात बाजारपेठेतील बहुतांश दुकानदारांनी नाले व गटारे बंदिस्त केली आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या सफाई कामगारांना नालेसफाई करताना अडचणी येत होत्या. शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावे यासाठी नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.
रोहे ः शहरातील नालेसफाई करण्यात येत आहे.
---------
महावितरणची कामे पूर्ण करण्याची लगबग
तळा (वार्ताहर) ः तालुक्यात भारनियमनामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावे सांगून दिवसभर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वीजबिल वसुली करण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या महावितरण विभागाला सुरळीत वीजपुरवठा ठेवणे मात्र नेहमी अवघड जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, पावसाळ्यापूर्वी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जीर्ण विद्युत खांब, विद्युत तारांजवळ वाढलेली झाडे, उघड्या डीपी आदी कामे बाकी आहेत. सध्या सुरू असलेला विजेचा लपंडाव पावसाळ्यातही कायम राहण्याची शक्यता आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.