एकविरा देवीच्या चैत्री यात्रेत दोन गटांत तुंबळ दगडफेक

एकविरा देवीच्या चैत्री यात्रेत दोन गटांत तुंबळ दगडफेक
Published on

एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेत दोन गटांत तुंबळ हाणामारी
पालखीच्या मानावरून वाद; १६ जण जखमी, १५ ते २० वाहनांचे नुकसान

लोणावळा, ता. २६ : चैत्री यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेत पारंपरिक विधी पार पाडले; मात्र सोहळा संपल्यानंतर एकवीरा गडाच्या पायथ्याशी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. त्यामध्ये १६ भाविक जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. तर १५ ते २० वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पनवेल आणि कल्याण येथील भाविकांच्या दोन गटांमध्ये पालखीच्या मानावरून बुधवारी (ता. २५) रात्री वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळला. एकवीरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिर परिसरात दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. या वेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भीतीपोटी अनेक भाविकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. काही स्थानिक दुकानांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी अष्टमीनिमित्त पहाटे देवीचे तेलवन व मानाचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये धुसफूस कायम होती. वादावादीवर पडदा पडल्याचे वाटत असतानाच गुरुवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आला आणि पायथा मंदिर, वनखात्याच्या वाहनतळ परिसरात दोन्ही गटांकडून पुन्हा दगडफेक झाली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी कल्याण तसेच पनवेल येथील दोन्ही गटांतील १७ जणांवर गुन्हे दाखल केले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या वातावरण शांत असल्याचे सांगण्यात येत आहे.


पोलिस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह
चैत्री यात्रेला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. यंदाही मोठी गर्दी अपेक्षित असतानाही पायथा, वाहनतळ परिसरात पुरेसा बंदोबस्त नसल्याची चर्चा भाविक व स्थानिकांमध्ये सुरू आहे. रात्री झालेल्या वादानंतरही तातडीने कडक बंदोबस्त न ठेवल्याने गुरुवारी सकाळी पुन्हा दगडफेक झाली. त्यामुळे, पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक प्रभावी बंदोबस्ताची मागणी होत आहे.

LON26B05376

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com