लसीकरणामुळे लंपी आटोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणामुळे लंपी आटोक्यात
लसीकरणामुळे लंपी आटोक्यात

लसीकरणामुळे लंपी आटोक्यात

sakal_logo
By

महाड, ता. ११ (बातमीदार) : संपूर्ण देशात जनावरांमध्ये लंपी हा आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महाड तालुक्यात लंपी आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसली, तरी नोव्हेंबरपासून आतापर्यंत जवळपास ४१ जनावरांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने लंपी आजारावर लसीकरण मोहीम राबवत महाड तालुक्यात २४ हजार ७०० जनावरांना लस देण्यात आली. यामुळे हा आजार आटोक्यात आला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे विस्कळित झालेले मानवी जीवन स्थिरस्थावर होत असतानाच पाळीव जनावरांनाही विषाणूंचा विळखा बसू लागला आहे. कोरोनाप्रमाणे गुरांमध्ये लंपी या आजाराची लक्षणे दिसून येताच शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. सुरुवातीच्या काळात दुध विक्रीवरही याचा परिणाम जाणवू लागला होता. संपूर्ण देशात पाळीव जनावरांना लसीकरण करण्याचे आदेश सरकारने दिले. पशुवैद्यकीय विभागाने तालुक्यात लसीकरण पूर्ण केले असले, तरी आजही जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. महाड तालुक्यात नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत ४१ जनावरांना लंपीची बाधा झाली होती. तर पाच जनावरे या आजाराने मृत्यू पावल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. लसीकरण आणि सरकारी आदेशानुसार केले जाणारे उपाय यामुळे महाड तालुक्यात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे.

महाड तालुक्यात लंपी आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारी आदेशानुसार प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. तालुक्यातील रुपवली, पाणे, वरंध, किंजालोळी, पारमाची, तळीये, तेलंगे, घेरा किल्ला रायगड, मुमुर्शी आदी गावांतून लंपीच्या आजाराने जनावरे ग्रस्त झाली होती. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत जनावरांची काळजी घेतली असली, तरी पाच गुरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लंपीने एक गाय मृत्यूमुखी पडल्याने या आजाराचा धोका आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. लंपी आजाराबाबत महाड तालुक्यात जवळपास २४ हजार ७०० जनावरांचे लसीकरण झाले आहे. लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते, तोंडातून लाळ पडते, शरीरावर छोट्या गाठी यायला लागतात. अशी लक्षणे गाई आणि म्हशीमध्ये पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली आणि महाड तालुक्यातील किंजळोली, निगडे आदी गावांमध्ये आजही दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लंपीचे बळी
तळीये २
आंबेशिवथर १
पिंपळवाडी १
किंजलोळी १
एकूण ५
.........
लंपी हा जनावरांचा त्वचा विकार आहे. त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय विभागाकडे संपर्क साधावा. शिवाय प्राथमिक उपचार म्हणून कडूनिंब पानांच्या लेपाचा वापर करावा.
- डॉ. आश्विनी पडळकर, पशुवैद्यकीय अधिकारी, महाड
..............