रसायनवाहू टँकर धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनवाहू टँकर धोकादायक
रसायनवाहू टँकर धोकादायक

रसायनवाहू टँकर धोकादायक

sakal_logo
By

सुनील पाटकर
महाड, ता. ७ ः मुंबई-गोवा महामार्गावर रासायनिक टँकरची वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. चौपदरीकरण होऊनही अपघातांच्या घटना घडतच आहेत. रसायनवाहू वाहनांच्या अपघातांचा प्रश्न केवळ रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित न राहता रस्ते सुरक्षा, नागरिकांची सुरक्षितता, वन्यजीव सुरक्षितता, हवा व पाणी प्रदूषण या घटकांनाही कारणीभूत ठरू लागला आहे. सरकारी आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्यामध्ये रसायनवाहू टँकरमुळे होणाऱ्या आपत्तीकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने यापासून निर्माण होणारी आपत्ती भविष्यात गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
महाडजवळील दासगाव येथे ३ दिवसांपूर्वी रसायनवाहू टँकर कलंडल्याने दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर याआधी कशेडी घाटात रसायनवाहू टॅंकर कलंडल्याने झालेल्‍या वायुगळतीचा त्रास होऊ नये, म्हणून परिसरातील गावे हलवावी लागलेली होती. दासगाव येथेही तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा टॅंकर कलंडल्याने ग्रामस्थांनी घरातून पळ काढला होता. या सर्व घटनांचा विचार करता, अवजड वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक व्यवस्था धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यात महाड, रोहा, नागोठणे, तळोजा, भागाड या ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम व गोव्यापर्यंत या ठिकाणी दररोज रसायनांची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरून वर्दळ असते. या वाहनांना अपघात झाल्यास निर्माण होणारा धोका व त्याच्या परिणामांचा विचार फारसा होताना दिसत नाही. गळतीनंतर रसायने नदीनाल्यात मिसळल्यास जलचर प्राण्यांनाही परिणाम भोगावे लागतात, हे यापूर्वी घडलेल्‍या घटनांमधून स्‍पष्‍ट झाले आहे.

रसायनांच्या माहितीपासून अनभिज्ञ
वाहनांमधील रसायन हवा, पाण्याच्या संपर्कात आल्यास काय परिणाम होतो अथवा गळती झाल्‍यास काय परिणाम होईल, याबाबत चालकापासून पोलिस, स्‍थानिक प्रशासन सारेच अनभिज्ञ असतात. महामार्गांवर रसायनवाहू वाहनांना अपघात झाल्यानंतर यामधील रसायनांची माहिती, तातडीने करावयाच्या उपाययोजना, परिसरातील ग्रामपंचायतींना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण याची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते. अपघतानंतर मदतीसाठी धावणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही याबाबतची फारशी माहिती नसते. त्यामुळे भविष्यामध्ये मोठ्या दुर्घटनेची तसेच महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

बचाव साधनसामुग्री कमतरता
ज्‍वलनशील वस्‍तू, घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघात झाल्‍यास मदतीसाठी स्वतंत्र उपकरणे व पथके लागतात. परिसरातील कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी अशा वेळी मदत करतात. कंपन्यांकडून आग, वायुगळती रोखण्यासाठी साधने पुरवली जात असली तरी सरकारी पातळीवर मात्र ठोस उपाययोजनांची वानवा आहे. रसायनांची वाहतूक करणारा चालक किमान सुशिक्षित असावा, त्याला रसायन हाताळणीबाबत व अपघात झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देणे बंधनकारक असते. अशा चालकांकडे रसायनांची माहिती देणारे ट्रम्पकार्ड सक्तीचे केलेले असते. त्यांची तपासणीही करणे आवश्यक आहे, मात्र अनेकदा ही तपासणी फारशी गांभीर्याने होताना दिसत नाही.

रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघातांत मदत कार्यासाठी सेल्फ कन्टेन्ड ब्रिथिंग ऑपरेटर्स (एसीबीए) आणि स्पिल कंट्रोल किटची अत्यंत आवश्यकता असते. परंतु तशा प्रकारची व्यवस्था कुठेही दिसत नाही. जिल्ह्यातील आठ मोठ्या कंपन्यांकडून सरकारी यंत्रणेला मदत कार्य केले जाते, मात्र प्रशासनाकडे स्‍वतःची अशी साधनसामुग्री नाही. महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहने सुसाट जातात, त्‍यात घाटरस्‍त्‍यावरील अवघड वळणार अपघाताच्या घटना वारंवार घटत आहेत. या सर्वांचा विचार करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांचे अपघात रोखणे अथवा तातडीने नियंत्रण मिळविणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.