
वीरेश्वर महाराज छबिनोत्सवाची जय्यत तयारी
महाड, ता. १५ (बातमीदार) : महाडचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव लवकरच सुरू होणार आहे. उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महाडच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड यांनी दिली.
वीरेश्वर देवस्थान पंच कमिटी, स्थानिक प्रशासन यांची संयुक्त बैठक नुकतीच महाड प्रांताधिकारी पुदलवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. याप्रसंगी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नायब तहसीलदार सुरेश खोपकर, देवस्थान पंचकमिटीचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, विश्वस्त अनंत शेठ, गणेश वडके, संजय पवार त्याचबरोबर उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष गजानन काप व इतर उपस्थित होते.
वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. पंच कमिटीने देखील उत्सव योजनाबद्ध साजरा करण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुदलवाड यांनी केले. तहसीलदार सुरेश काशीद यांनी देखील प्रशासनाच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली. प्रशासनाकडून पंच समितीला काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
महाशिवरात्रीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यात्रेमध्ये पाळणे, चक्र इत्यादी खेळ लावताना योग्य काळजी घेणे आवश्यक असून पाळणे लावण्यापूर्वी त्याची तपासणी करावी आणि नंतरच पंच समितीने परवानगी द्यावी, तसेच दुकानदारांना वीज पुरवठा करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी. याकरिता एमएसईबी यांचा ना हरकत दाखला घेण्यात यावा. दुकानदारांनी वाळूच्या बादल्या, अग्निरोधक यंत्रणा तत्पर ठेवावी.
- सुरेश काशीद, तहसीलदार
महाड