आपत्तीशी सामना करण्यासाठी आपदा मित्र सज्‍ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्तीशी सामना करण्यासाठी आपदा मित्र सज्‍ज
आपत्तीशी सामना करण्यासाठी आपदा मित्र सज्‍ज

आपत्तीशी सामना करण्यासाठी आपदा मित्र सज्‍ज

sakal_logo
By

महाड, ता.१४ ( बातमीदार) : नैसर्गिक व अन्य आपत्ती निर्माण झाल्यानंतर तत्काळ मदतकार्य मिळणे महत्वाचे असते. आपत्तीत बचावकार्य करून जीवितहानी टाळण्यासाठी सरकारी पातळीवर आपदा मित्र तयार केले जात आहेत. आपत्तीशी सामना कशा पद्धतीने करायचा, याचे प्रशिक्षण सरकारी यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहेत. आपत्ताग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या महाडमध्ये आपत्तीशी सामना करण्यासाठी ६६ प्रशिक्षित आपदा मित्र सज्ज झाले आहेत.
संपूर्ण कोकणात नैसर्गिक आपत्ती तसेच अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध आपत्तीशी सामना करताना प्रशासनाची दमछाक होते. कोकणातील महाड आणि पोलादपूर हे दोन तालुके आपदग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात. १९९४ पासून दरडी कोसळणे, भूस्खलन, पूर अशा प्रकारच्या नैसर्गिक आपदांसह कोकण रेल्वे अपघात, सावित्री पूल दुर्घटना, आंबेनळी घाट अपघात, तारिक गार्डन इमारत दुर्घटना असा आपत्ती तालुक्यांनी अनुभवल्या आहेत. त्याचप्रमाणे विकसित रस्त्यांवर होत असलेले अपघात आणि वाढते औद्योगीकरणामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
तालुक्याचा विस्तार आणि होणाऱ्या घटनांच्या तुलनेत बचाव कार्यासाठी मनुष्‍यबळ अपुरे आहे. ज्या ज्या वेळी पूर परिस्थिती, वाहन अपघात, आणि इतर नैसर्गिक घटना घडतात, त्या त्या वेळी स्थानिक नागरिक, तरुण जीव धोक्यात घालून मदतीसाठी धाव घेतात. अशा वेळी स्थानिक तरुणांना किंवा आपत्तीशी सामना करणाऱ्या नागरिकांना प्रशिक्षित केले तर अनेकांचा जीव वाचणार आहे.
आपत्तीची सामना करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकरिता सरकारी स्तरावर स्थानिक आणि तरुणांना एकत्र करून आपदा मित्र ही संकल्पना पुढे आली आहे. याकरिता तत्कालिक जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात प्रशिक्षणाला सुरवात झाली.
महाड येथे सध्या अनेक तरुण व आपदा मित्र जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यामध्ये दरड संबंधातील सविस्तर माहिती डॉक्टर सतीश ठिगळे यांनी दिली तर नागरी संरक्षण विभागाचे एम.के. म्हात्रे यांनी सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. बारा दिवसांत ६६ आपदा मित्र आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित झाले आहेत.

पूरपरिस्थिती उद्भवल्यास, दरड कोसळली तर किंवा अपघात झाल्यास आपदा मित्रांनी नागरिकांची कशा पद्धतीने मदत करायची, याबाबतचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण देताना लागणारे साहित्यही प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्तीशी सामना करताना मदत करणारा आपदा मित्र स्वतःचा जीव कसा वाचू शकेल, याकरिता ही साधने कशी उपयोगी ठरतील, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

महाड ः मदत कार्यासाठी सज्ज झालेले आता मित्र