किल्ल्यांच्या प्रतिकृतींची शिवप्रेमींना भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ल्यांच्या प्रतिकृतींची शिवप्रेमींना भुरळ
किल्ल्यांच्या प्रतिकृतींची शिवप्रेमींना भुरळ

किल्ल्यांच्या प्रतिकृतींची शिवप्रेमींना भुरळ

sakal_logo
By

सुनील पाटकर, महाड
सह्याद्रीच्या कडे-कपारी आणि अथांग अरबी सागरात दिमाखात उभे असणारे छत्रपती शिवरायांचे गडदुर्ग आजही पराक्रमाची साक्ष देतात. स्वराज्याच्या जडणघडणीत या गडकिल्ल्यांचे मोठे महत्त्व आहे. पुढील पिढीला गडकिल्ल्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांची स्थापत्य शास्त्रातील मानकांप्रमाणे हुबेहूब व शास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेली प्रतिकृती शिवप्रेमी व इतिहास प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
दिवाळीमध्ये बच्चे कंपनी किल्ले बनवते. दगड,विटा, माती रचून हे किल्ले बनविले जातात. परंतु या किल्ल्यांना निश्चित अशी मोजमापे नसतात. महासंघाकडून बनवण्यात आलेले प्रतिकृती ‘टू द स्केल’ असल्याने ती प्रत्यक्ष किल्ल्यांप्रमाणेच दिसते. सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असणारे विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे किल्ले पाहून अनेक जण भारावून गेले आहेत.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने दुर्ग संवर्धन मोहिमेतील किल्ले प्रतिकृती हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे प्रकल्पाचा शुभारंभ मालवण येथे मोहन भागवत यांच्या हस्ते पार नुकताच झाला. ‘टू द स्केल’ अशी किल्‍ल्‍यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
सांगली येथील आर्किटेक्‍ट रमेश बलुरगी यांनी तब्बल दीड वर्षे प्रतिकृती तयार करण्यावर काम केले आहे. गुगल मॅपिंगद्वारे डिजिटल पद्धतीने किल्ले, भोवतालचा परिसर, किल्ल्यावरील ऐतिहासिक ठिकाणे, तटबंदी, बुरूज या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला. प्रत्यक्ष किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन मोजमापे घेण्यात आली. अत्यंत शास्त्रीय पद्धतीने हुबेहूब स्थापत्यशास्त्रातील मानकांप्रमाणे या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. यासाठी प्लायवूडचा वापर, फोम, पीओपी तसेच विविध साधनांचा वापर केला आहे. रंगसंगतीचा वापर देखील चपखल आहे. किल्ल्यावरील सर्व ठिकाणांची माहिती, तेथील नामफलक, किल्ल्यावरील राजवाडे, त्यावर असणारी नळीची कौले, मंदिरे, गडाचा दरवाजा, तलाव, तटबंदी, बुरुज किल्ल्यावरील झाडे, किल्ल्याभोवतालचा अथांग सागर या सर्वांची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे किल्ले शिवप्रेमी व विद्यार्थ्यांना मोहित करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून फिरल्यानंतर या दोन प्रतिकृती कायमस्वरूपी नामांकित संग्रहालयामध्ये ठेवले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अविभाज्य भाग असलेल्या किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ विविध उपक्रम राबवत आहे. त्यातूनच हा प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
- डॉ. राहुल वारंगे, सचिव, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ