लोकगीतातून जपला एकोपा

लोकगीतातून जपला एकोपा

सुनील पाटकर, महाड
कोकणात साजरे होणारे उत्सव म्हणजेच कोकणच्या लोकसंस्कृतीचे मूर्तिमंत उदाहरण. अनेक उत्सव, जत्रा येथील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतात. त्‍यापैकीच एक शिमगा. होळीच्या भोवती मोठ्या उत्साहाने म्हटली जाणारी पारंपरिक लोकगीते आजही बंधुत्वाची, समतेची साक्ष देतात. वाडी वस्तीवर विखुरलेल्या बारा बलुतेदार, अठरापगड जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्‍न उत्‍सवातून केला जातो.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी मोठ्या उत्साहात साजरी होते. काही ठिकाणी हा उत्सव पंधरा दिवस चालतो. होळीची सजावट, रंगांची उधळण, ग्रामदेवतांच्या पालख्या, जळती लाकडे फेकण्याचे खेळ, होळीच्या फागा, नमने, खेळे अशा अनेक प्रकाराने होळी दिमाखात साजरी होते. होळीच्या पहिल्या दिवसापासून मुख्य होळी म्हणजेच होम लागेपर्यंत होळीभोवती फिरून लोकगीते म्हटली जातात. यामध्ये सर्वच ठिकाणी
‘कळकीच्या बेटी एक कोम जन्माला
लावला वाकला गगनाशी गेला’
अथवा ‘वाकडा तिकडा गगनाशी गेला’ हे लोकगीत हमखास म्हटले जाते. या लोकगीताची सांगता झाली की होळी अथवा मुख्य होम पेटवला जातो.
होळीच्या दिवशी म्हटले जाणारे हे मुख्य लोकगीत लिखित स्वरूपात कुठे आढळत नाही. त्यातील शब्दही स्थानिक भाषेनुसार बदलत असले तरी आशय मात्र सारखाच असतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्काने हे गीते गायली जात असून त्‍यातून एकतेचे, लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. गावांतील बारा बलुतेदारांचे वर्णन या गाण्यांमध्ये दिसून येते. लोहार, सुतार, सोनार, कुंभार, कासार, शिंपी, तांबट अशा विविध प्रकारच्या बलुतेदारांना गाण्यांमध्ये मानाचे स्थान दिसते.
कळकीच्या बेटी एक या गाण्यांमध्ये सुतारदादानी पालखी बनवली, सोन्याची पालखी रुप्याचा ठसा, अशा या पालखीत कोण देव बसे, असे विचारत गावातील तसेच परिसरातील प्रत्येक देव देवतेचे नाव घेत होळीला प्रदक्षिणा घातल्या जातात. हातात अक्षता घेऊन फेरा मारत अक्षता होळीमध्ये फेकले जातात. खालुबाजा नाहीतर ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या मोठ्याने हे गाणे म्हटले जाते. सध्या गावागावांमध्ये या गाण्याचे सूर कानी पडत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत हे एकमेव गाणे थोड्याफार वेगळ्या शब्दरचनेत परंतु एकाच आशयामध्ये सामावलेले असल्याने कोकणचे हे अद्भुत लोकगीतच म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com