शिवप्रेमींना आढळले ब्राह्मी शिलालेख, ऐतिहासिक पाण्याचे टाके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवप्रेमींना आढळले ब्राह्मी शिलालेख, ऐतिहासिक पाण्याचे टाके
शिवप्रेमींना आढळले ब्राह्मी शिलालेख, ऐतिहासिक पाण्याचे टाके

शिवप्रेमींना आढळले ब्राह्मी शिलालेख, ऐतिहासिक पाण्याचे टाके

sakal_logo
By

महाड, ता. १९ (बातमीदार) : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गे दुर्गेश्र्वर किल्ले रायगड परिसरात अनेक ऐतिहासिक, अद्भुत अपरिचित ठेवा दडला आहे. अतिदुर्गम भाग आणि घनदाट जंगलांमुळे स्थानिक नागरिक व भटकंती करणारे निसर्गप्रेमी वगळता अनेकांना याची माहितीही नाही. रायगड आणि लिंगाण्याच्या परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत अनेक अपरिचित स्थळे, पाणवठे, विरगळी, अनेक छुप्या गुहा आढळून येत आहेत. महाड तालुक्यातील पाने गाव जंगलात पाणीसाठा असलेले पाण्याचे टाके व शेजारी ब्राह्मी लिपीतील शिलालेखही सापडले आहे. हे टाके सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी खोदले असल्याच्या अंदाज इतिहासकरांकडून वर्तवण्यात येत आहे.
सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या खडतर पायवाटेवर एका कातळकड्याला पडलेल्या एक इंचाच्या भेगेतून वर्षोनुवर्ष एका धारेत कायमस्वरूपी शुद्ध आणि चविष्ट पाणी वाहते. शिव काळात बहुतेक हा व्यापारी मार्ग असावा कारण हे पाणी साठवून ठेवण्यासाठी त्याच कातळात कोरून एक-दोन मीटर खोल व एक मीटर रुंद टाके बनवण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सह्याद्रीच्या रांगेत कुठेही पाण्याचे स्रोत नसताना कड्याच्या भेगेमधून अखंड पाणी येत असते. यात्रेकरू व व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हे टाके खोदले असावे, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.
साद सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार व शोध घेत टाक्याचा अभ्यास केला. पाने ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी लोक शिकारीला गेले की या ठिकाणी सोबत आणलेली भाकरी खाण्यासाठी बसत आणि येथील थंडगार पाणी पीत. शिकाऱ्यांच्या भाल्‍याच्या खुणाही येथे आढळतात. टाक्याच्या बाजूला एक भले मोठे झाड असल्याने झाडाची पाने टाक्यात पडतात, तरीही पाणी फिल्टर केल्यासारखे शुद्ध आहे. टाके साफ करून त्याला पुन्हा खाली एक बांध घातला तर रानातील जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळू शकेल, असे पाने ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

साद सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे येथील शिलालेख व त्यावरील माहिती, टाके नेमके कधी व कोणी खोदले आहे, याचा अभ्यास करून एक संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. अजून शोध मोहीम घेतल्यास बऱ्याच ऐतिहासिक बाबी उलगडू शकतात.
- केतन फुलपगारे, मुख्य सल्लागार, साद सह्याद्री प्रतिष्ठान

महाड ः पाणी साठवण टाके