पाण्यासाठी महाडकरांची धावपळ

पाण्यासाठी महाडकरांची धावपळ

Published on

महाड, ता. १८ (बातमीदार) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे व कुर्ले धरणातील मृत पाणीसाठाही संपत आल्याने महाडमध्ये पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्‍या आहेत. दिवस उजाडताच मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी महाडकरांची धावपळ सुरू होते. पाणी नसल्‍याने शाळा सुरू झाल्‍या तरी अनेकांनी गावीच राहणे पसंत केले आहे.
महाड शहराला प्रामुख्याने कुर्ले धरण व कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय एमआयडीसीतून शहरातील पूर्वेकडील व उत्तरेकडील काही भागात पाणीपुरवठा होतो. या ठिकाणांहून दररोज ४० दशलक्ष घनमीटर पाणी नगरपालिका शहराला पुरविते. कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी आणण्यात आले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून पालिकेला मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत होता, परंतु आता मृतसाठाही संपल्‍याने गढूळ पाणी कसेबसे मिळत आहे. अनेक भागत पाणीच येत नसल्याने सकाळपासून पाणी मिळविण्यासाठी महाडकरांची धावपळ सुरू होत आहे.
शहरातील विंधन विहिरीतून काही ठिकाणी पाणी भरले जाते. तर काहीजण खासगी टँकर्स मागवतात. रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांतून सध्या पाण्याची वाहतूक होताना दिसते. पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल पाण्याचे जारलाही मोठी मागणी आहे, मात्र वापराच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या त्रासाला कंटाळून शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अनेकांनी गावचा रस्ता धरला आहे.
कोतुर्डे धरणाचे नियोजन करताना २०३१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून शहरासाठी योजना आखण्यात आली. परंतु २०२० पासूनच योजनेतील पाणी शहराला अपुरे पडत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता, लवकरच पालिकेला पर्यायी पाणी योजना उभी करावी लागणार आहे. अन्यथा महाड शहराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.
शहरातील काही भागाला कुर्ले धरणातून पाणी मिळते. कुर्ले धरण १९६६ मध्ये बांधले असून १९८६ मधील लोकसंख्या गृहीत धरून योजना आखण्यात आली होती. त्यामुळे या धरणातील पाणीसाठाही अपुरा पडत आहे.

चवदार तळ्यावरील आरओ पाण्याचा आधार
महाडमध्ये येणाऱ्या भिमसैनिकांच्या सेवेसाठी या वर्षीपासून पालिकेने चवदार तळ्यावर आरओ प्रकल्‍प कार्यान्वित केला आहे. त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पाणी भिमसैनिकांना मिळते. आपत्‍काळात येथील पाणी महाडकरांचा आधार बनले आहे. तळ्यावर असलेल्या नळातून नागरिक पाणी भरून नेत आहेत.

गृहनिर्माण सोसायटींना खासगी टँकर
शहरात अनेक इमारती असून वरच्या मजल्‍यावर पाणी भरून नेताना रहिवाशांची दमछाक होते. दररोज मोठ्या प्रमाणात या इमारतींना पाणी लागत असल्याने खासगी टँकर दररोज मागवले जातो. त्‍यासाठी ८०० ते १५०० रुपये टँकर्ससाठी खर्च करावे लागतात. नगरपालिकेकडूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा आहे.

कोथेरी धरण रखडल्याने पाणीप्रश्न प्रलंबित
महाड तालुक्यातील कोथेरी धरणाला २०१९ मध्ये १२० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली, मात्र पुनर्वसनाचा प्रश्नावर तोडगा न निघाल्‍याने धरणाचे काम रखडले आहे. या धरणातील पाणी महाड शहरासाठी राखीव ठेवले जाणार असल्याने हे धरण महाडकरांसाठी उपयुक्त आहे. महाड शहरासह अकरा गावांना धरणाचा फायदा होणार आहे.
महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोथेरी गावात स्थानिक नदीवर जलसंपदा विभागाकडून मातीचे धरण बांधले जात आहे. धरणातील पाणीसाठा ८.८० दशलक्ष घनमीटर असून जवळपास ५४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सिंचनाचा लाभ कोथेरी, कोल, शिरगाव, चोचिंदे, मुठवली, दादली, किंजळघर, वडवली, कोंडीवते, राजेवाडी, कांबळे या ११ गावांना होणार आहे.

पाऊस लांबल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे व कुर्ले धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. नागरिकांना पाणी जपून वापरावे. चवदार तळे आरओ प्रकल्‍पातूनही नागरिकांना पाणी दिले जात आहे.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी,महाड

महाड ः कोतुर्डे धरणातील मृतसाठा
महाड ः टँकर येताच पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.