नक्षत्राचा पाऊस

नक्षत्राचा पाऊस

Published on

नक्षत्राचा पाऊस
गमतीदार नावे; वाहनांवरून बांधला जातो अंदाज

सुनील पाटकर, महाड
जून महिला सुरू झाला की शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतात. इतकेच नव्हे-पक्षी असो, धरणीमाता असो वा ओसाड शेती साऱ्यांनाच ओढ असते पावसाच्या आगमनाची. ग्रामीण भागात पावसाला नातेसंबंधात गुंफणारी अनेक नावे आहेत. या नावाप्रमाणेच नक्षत्रात येणाऱ्या विविध वाहनांवरूनही आजही पावसाचा अंदाज बांधला जातो. एका बाजूला हवामान खाते अत्याधुनिक तंत्राने प्रगत होत असतानाही नक्षत्र आणि वाहनानुसार पावसाचा अंदाज बांधण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब आजही ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी बांधवांकडून होताना दिसतो.

पावसाळ्यात येणारे उधाण, अतिवृष्‍टी, लाटांची उंची याचा अंदाज हवामान विभागाकडून नेहमीच वर्तवला जातो. या अंदाजानुसार कधी मुसळधार, कधी मध्यम तर कधी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचे तर्क-वितर्क लावले जातात. हवामान खाते अस्तित्वात नव्हते, तेव्हापासून पूर्वापार, ऐतिहासीक काळापासून शेतकरीवर्ग नक्षत्र आणि त्यांची वाहने यावर पडणाऱ्या पावसाचा अंदाज लावायचे. आजही ग्रामीण भागांमध्ये पावसाची वाहने व पावसाची विविध नावे हा एक अनोखा, गमतीचा व संशोधनाचाही विषय आहे.
ग्रामीण भागात शेतकरी वर्गाने पावसांची नावे ठेवतानाही त्याला विविध नातेसंबंधाची जोड दिली आहे. हा पाऊस कधी तरणा असतो, तर कधी म्हातारा असतो. कधी सूनेचा पाऊस बरसतो तर कधी सासूचाही बरसत असतो. पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, पुष्य नक्षत्रातील पावसाला म्हातारा, मघा नक्षत्रातील पावसाला सासूचा तर पूर्वा नक्षत्रातील पावसाला सूनेचा पाऊस म्हणतात. याशिवाय रग्बीचा पाऊस, हत्तीचा पाऊस तर असलकाचा पाऊस अशी नावेही पावसाला मिळाली आहेत. सुनेचा पाऊस दणाणणारा मानला जातो तर म्हातारा पाऊस रडतखडत पडतो. अशी ही पावसाची वेगळी नावे व त्यानुसार लावला जाणारा अंदाज गमतीचा विषयही ठरतो आहे.
याशिवाय नक्षत्रामधील विविध प्राण्यांच्या नावे असणारी वाहने पावसाच्या लहरीपणाचा अंदाज देतात. हत्ती, बेडूक आणि म्हैस हे वाहन असल्‍यास मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवली जाते. तर उंदीर, गाढव व मेंढा या वाहनांमध्ये कमी पाऊस पडतो. मोर, कोल्हा आणि घोडा ही वाहने आल्यास मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्‍यता वर्तवली जाते. पावसाचा अंदाज बांधणारी ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. या पद्धतीला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी हे ठोकताळे बहुतांशी प्रमाणात यशस्वी होत असल्याचे ज्येष्ठ शेतकरी तुकाराम देशमुख सांगतात.

असे ठरवतात वाहन
सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत त्‍यांची संख्या मोजली जाते आणि येणाऱ्या संख्येस नऊने भागले जाते. जी बाकी उरते त्यानुसार प्रत्येक अंकास एकेक प्राणी वाहन म्हणून मानला जातो. शून्य बाकी राहिल्यास हत्ती, घोडा एक, कोल्हा दोन, बेडूक तीन, मेंढा चार, मोर पाच, उंदीर सहा, म्हैस सात व गाढव आठ अशा बाकीनुसार वाहन संख्या निश्चित केलेली असते. जून ते ऑक्टोबर पावसाची ११ नक्षत्रे समजली जातात. एका नक्षत्राचा कालावधी सुमारे १४ दिवसांचा असतो.

पावसाचा अंदाज
तारीख-नक्षत्र-वाहन
८ जून- मृग-हत्ती,
२२ जून - आर्द्रा-मेंढा
६ जुलै- पुनर्वसू-गाढव
२० जुलै-पुष्य-बेडूक
३ ऑगस्ट-आश्लेषा-म्हैस
१७ ऑगस्ट-मघा-घोडा
३१ ऑगस्ट-पूर्वा-मोर
१३ सप्टेंबर-उत्तरा-हत्ती
२७ सप्टेंबर-हस्त-बेडूक
११ ऑक्टोबर-चित्रा-उंदीर
२४ ऑक्टोबर-स्वाती-घोडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.