महाडमधील धरणे, पर्यटनस्थळांवर बंदी

महाडमधील धरणे, पर्यटनस्थळांवर बंदी

Published on

महाड, ता. १० (बातमीदार) : पावसाळ्यात धबधबे व ओसंडून वाहणारी धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. अशा ठिकाणी मौजमजा करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र अतिउत्‍साह, तसेच बेशिस्त वागण्यामुळे काही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाड तालुक्‍यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्याच्या एक किमी परिसरात ३ सप्टेंबरपर्यंत उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी, प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केले आहेत.
पावसाळ्यात मांडले, केंबुर्ली, वाकी बु. नानेमाची, मौजे भावे येथे धबधबे तर कोतुर्डे, वरंध, खैरे, कुर्ले, खिंडवाडी येथील धरणे ओसंडून वाहू लागतात. महाडजवळ सव येथे गरम पाण्याचे झरे असल्यामुळे या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांची व नागरिकांची जीवित व वित्तहानी होऊ नये तसेच शासकीय व खासगी मालमत्तेची हानी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी, यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार नैसर्गिक धबधबे, धरण परिसरात मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. धोकादायक ठिकाणे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ.ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण, फोटोग्राफी करण्यास बंदी आहे. खोलपाण्यात उतरणे व पोहण्यास मनाई आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्‍टिकच्या बाटल्या फेकणे, महिलांची छेडछाड, असभ्‍य वर्तन करणे, मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवण्यास बंदी असून नागरिकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
- डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी, महाड

महाड - नानेमाची येथील धबधबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.