मराठा समाज माझा मायबाप
महाड, ता. १९ (बातमीदार) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी करत असलेले आंदोलन एक मुलगा म्हणून मी करत आहे. मराठा समाज माझा मायबाप आहे. त्यामुळे मी समाजावर कोणतेही उपकार करत नाही. मला यातील काहीही नको. आपला समाज आनंदात राहावा, हीच माझी अपेक्षा असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी महाड येथील जाहीर सभेत सांगितले.
महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मराठा समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूची माहिती मिळाल्यानंतर त्याला ते शासन करायचे. त्याचप्रमाणे मराठ्यानाही आपले शत्रू कोण, याची जाणीव झाली आहे. सत्तर वर्षे मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्या सात पिढ्या बरबाद झाल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी महाड येथील जाहीर सभेत केला.
मराठा समाजाच्या या आंदोलनात आता शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, उद्योजक अशा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक जण आपली स्वतःची लढाई म्हणून सहभागी होत आहे. मराठ्यांची ही एकजूट झाल्याने मराठ्यांना आता शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. आपले हे आंदोलन पहिले आणि शेवटचे आंदोलन असेल, अशी खात्री यावेळी जरांगे पाटील यांनी दिली. मराठ्यांच्या मुलांकडे गुणवत्ता असूनदेखील ते मागे राहत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात पुरावे नाहीत, अशा प्रकारची खोटी माहिती देऊन मराठ्यांना वारंवार आरक्षणापासून दूर ठेवले गेले. मराठा एकत्रित झाल्यानंतर सरकारला पुरावे सापडू लागले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावात आरक्षणाचे पुरावे मिळत आहेत. त्यामुळे आता आपल्याला शंभर टक्के आरक्षण मिळणारच, असेही जरांगे पाटील यांनी या वेळी सांगितले. यापुढे आपले आंदोलन शांततेत झाले पाहिजे. भांडणे लावायची कामे सध्या सुरू असली, तरी याकडे आपण दुर्लक्ष करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. दरम्यान या सभेला दक्षिण रायगडमधील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
..
नंतर राजकारण करा
मराठा समाजातील बांधवांनी अनेक राजकीय पक्षांचे बॅनर गावोगावी लावले; परंतु त्यांना काय मिळाले. आता फक्त आरक्षणासाठी काम करा, आरक्षणाचे बॅनर लावा, असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीकेची जोड उठवली. स्वतःच्या लेकरांसाठी पहिले लढा; नंतर राजकारण करा, असा सल्लादेखील त्यांनी या वेळी उपस्थितांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.