वणवा मुक्ती व जंगल संवर्धनासाठी वनप्रेमी व वारकऱ्यांनी काढली पदयात्रा

वणवा मुक्ती व जंगल संवर्धनासाठी वनप्रेमी व वारकऱ्यांनी काढली पदयात्रा

वणवामुक्तीसाठी वारकऱ्यांनी पदयात्रा
जंगल संवर्धनासाठी वनप्रेमींची जनजागृती

महाड, ता. १० (बातमीदार) : जंगलातील वणवा ही आता एक मोठी सामाजिक समस्या बनू लागली आहे. वणव्यामुळे वनसंपदेबरोबरच पशुपक्ष्यांची मोठी हानी होत आहे. वणवे थांबवण्यासाठी व जंगल वाचविण्यासाठी महाड तालुक्यातील भिवघर येथील वनप्रेमी सामाजिक संस्थेने वारकऱ्यांच्या साथीने शुक्रवारी (ता. ८) पाच किलोमीटरची पदयात्रा व दिंडी काढली आणि वणवामुक्ती आणि जंगल संवर्धनाचा संदेश दिला.
दहा वर्षांहून अधिक काळ वनप्रेमी संस्था व संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिवघर व परिसरात वणवामुक्ती अभियान राबवले जात असून जनजागृती करण्यात येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त यंदा वनप्रेमी संस्था तसेच महाडमधील गणेशनाथ सांप्रदायाच्या वतीने भिवघर ते संगम-भोराव अशी पाच किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये पुरुषांबरोबरच महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. भिवघर येथून निघालेली पदयात्रा कातीवडे, ढालकाठी, सेना महाराज मंदिर येथे येऊन वारकऱ्यांसह बोरगाव, आकले व भिवघर विठ्ठल मंदिर अशी काढण्यात आली. विठ्ठल मंदिरात दिंडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी वणव्यामुळे ओस पडणारे जंगल, तापमान वाढ, शेतकऱ्यांच्या पिकांवर व भूगर्भातील पाणी पातळीवर वणव्यामुळे होणार परिणाम, वन्यजीवांच्या नामशेष होत जाणाऱ्या प्रजाती याबाबत संस्थेकडून उपस्थितांना माहिती देण्यात आली. पदयात्रेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष दीपक अमराळे, सदस्य संजय पवार, भीमराव कदम, विक्रम पार्टे, गणेश नाथ संप्रदायाचे राम मेस्‍त्री, अंकुश मोरे व इतर पदयात्री सहभागी झाले होते.

महाड ः वणवा मुक्तीसाठी पदयात्रा काढण्यात आली होती.

.................

घेरासुरगड गावातील फळबागेला आग

गुरे बचावली; मात्र लाखोंचे नुकसान

रोहा, ता. १० (बातमीदार) ः कोलाड-खांब गावाजवळ असलेल्या घेरासूरगड गावात २० एकर शेतजमिनीत गुरुवारी लागलेल्‍या आगीत फळबागेसह पेंढा खाक झाला. आगीमुळे गावातील दत्तात्रेय पार्टे, कृष्णा शेलार, चंद्रकांत पार्टे, एकनाथ पाशिलकर या शेतकऱ्यांच्या बागेची अक्षरशः राखरांगोळी झाली. शेकडो फळझाडे, पेंढे, तयार कडधान्ये खाक झाल्‍याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी शेतकऱ्यांनी गोठ्यातील गुरे चरण्यासाठी सोडल्‍याने ती वाचली.
दरम्यान या घटनेची कल्पना महसूल विभागाला देण्यात आली असली तरी अद्याप घटनास्‍थळी अधिकारी, कर्मचारी पाहणीसाठी आले नसल्‍याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी, म्हणून पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
खांब, घेरासुरगड या ग्रामीण भागातील जमीन सुपीक असून शेतकरी दुबार पीक घेतात. शेती आणि फळ लागवडीवर त्‍यांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र बहरलेल्‍या बागेला अचानक आग लागल्याची काबाडकष्‍ट करून पिकलेली शेती, कडधान्याचे पीक खाक झाल्‍याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरपंच, ग्रामपंचायत सदस्‍यांनी आगीबाबत तलाठी, कृषी अधिकारी, संबंधित विभागांना माहिती दिली आहे, मात्र अद्याप कोणीही दखल घेतली नसल्‍याची खंत शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. आगीमुळे कृष्णा शेलार यांच्या बागेतील जायफळ, सीताफळ, लिंबू, पेरू, केळी, फणस, नारळ, आंब्यांची झाडे, कढीपत्ता, बांबू ही झाडे होरपळली. तर एकनाथ पाशिलकर यांचे एक हजार पेंढे जळून खाक झाले. चंद्रकांत पार्टे व दत्तात्रेय पार्टे या दोघा सख्या भावाचे शेकडो पेंढे, आंब्यांची झाडे, फणस, नारळ, काजू, चिकू, जांभूळ, कढीपत्ता, बांबु, तूर, वाल असे कडधान्य जळून खाक झाली आहेत. याबाबत रोह्यातील कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्‍याचे सांगितले.

आगीमुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती गावातील लोकप्रतिनिधी यांनी संबंधित विभागाला दिली आहे. मात्र अद्याप पंचनामा करण्यासाठी किंवा घटनेबाबत माहिती घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. महसूल, कृषी अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्‍न करावेत.
- चंद्रकांत पार्टे, नुकसानग्रस्त शेतकरी

रोहा : आगीमुळे फळझाडे, कडधान्य पीकासह शेकडो पेंढे खाक झाले.

-----------

वणव्यात तीन गोठे, भात खाक
माणगाव (वार्ताहर) ः तालुक्यातील खरवली विभागातील साले गावात
शुक्रवारी (ता. ८) दुपारी अज्ञाताने वणवा लावल्यामुळे भडकलेल्‍या आगीत बौद्धवाडी तसेच घराशेजारी असलेले तीन गोठे तसेच कातळावर रचून ठेवलेल्या भात व पेंढ्याची मळणी खाक झाली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. वणव्याची माहिती मिळताच, माणगावचे तहसीलदार विकास गारूडकर यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क करून तलाठी विशाल वाघमारे यांना घटनास्‍थळी पाठवले आणि पंचनामे करण्यात आले.
साले बौद्धवाडीतील रहिवासी काशिनाथ भिकू मोरे यांचा गोठा व त्यातील साहित्य तसेच सिद्धार्थ शिवराम मोरे यांचा गोठा व त्यातील साहित्य व राजेश सहदेव भोनकर यांचा गोठा व त्यातील कडधान्य हे सर्व आगीत खाक झाले तर राकेश मोरे यांचा पेंढा तसेच भातमळणी जळाली. यात काशिनाथ मोरे यांचे एक लाख २५ हजारांचे, सिद्धार्थ मोरे यांचे ८० हजार, राकेश मोरे यांचे ५० हजार तर राजेश भोनकर यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी समक्ष जागेवर येत पाहणी करून पंचनामा केला आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पडवळ यांनी केली आहे.

माणगाव ः वणव्यामुळे गोठा, भाताची पेंढा खाक झाला.

-------------------

चौलमध्ये वणव्यांमुळे वनसंपदेला धोका

रेवदंडा (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील चौल- सराईमधील डोंगराला लागलेल्या वणव्यातून वनसंपदेचे नुकसान झाले होते, मात्र जवळच असलेल्‍या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने मुख्याध्यापिका यांनी झाडांचे संगोपन करून, नियमित पाणी देऊन जीवदान दिले. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा वरंडेमधील खासगी जागेत वणवा लागल्‍याने त्‍याच्या झळा डोंगरावरील वनराईला बसण्याची शक्‍यता होती, मात्र वनीकरण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत वणवा विझवल्‍याची माहिती वनरक्षक मौलेश तायडे यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी चौलमधील धावीर डोंगर परिसरात वणवा लागून तो पायथ्याकडे पसरत होता. या वेळी स्‍थानिकांनी वणवा विझवल्‍याने अनर्थ टळला. सलग दोन वर्षे पावसाळ्यात चौलमधील निसर्गप्रेमी संस्थेचा चमू विविध प्रकारची झाडे लावून वृक्ष संवर्धनसाठी प्रयत्‍न करीत आहेत. या ठिकाणी पुन्हा वणवा लागू नये तसेच वनसंपदा टिकवण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती निसर्गप्रेमी राकेश काठे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com