महाडमध्ये अनोख्या बॅनरने वेधले लक्ष

महाडमध्ये अनोख्या बॅनरने वेधले लक्ष

महाड , ता. २९ (बातमीदार) : सर्वच शहरांत मोकळ्या जागेवर तसेच उघड्यावर टाकला जाणारा कचरा ही जटिल समस्या बनत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्‍थानिक प्रशासनाकडून प्रयत्‍न होत असे तरी त्‍याला फारसे यश येतेच असे नाही. महाडमधील बिरवाडी गावातील एका नाक्यावर यासंदर्भात लावलेला बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनला आहे.
रस्त्यावर टाकला जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्‍यामुळे आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असल्‍याने स्‍थानिक रहिवाशांनीच नाक्‍यावर हा बॅनर लावला असावा, असा अंदाज आहे. यात बिरवाडी शहर ‘विषाची परीक्षा घेऊ नका’ या मथळ्याखाली कचरा टाकणाऱ्यांविरोधात अत्यंत मार्मिक, खोचक टिप्पणी केली आहे.
यामध्ये जो पुरुष या ठिकाणी कचरा टाकेल, त्याची बायको लवकर मरेल, जी बाई या ठिकाणी कचरा टाकेल तिचा नवरा लवकर मरेल!, जे तरुण-तरुणी या ठिकाणी कचरा टाकतील त्यांची लग्न होणार नाहीत!, जी शाळकरी मुले-मुली या ठिकाणी कचरा टाकतील ते कधीही पास होणार नाहीत!, सतत नापास होतील! अशा खरमरीत मुद्द्यांसह ‘चुकीला माफी नाही’ असेही नमूद केले आहे.
बॅनरवरील खरमरीत संदेशामुळे सध्या तरी कचरा टाकणे बंद झाल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु बॅनरवरील मजकूर पाहता परिसरातील नागरिकांना कचऱ्याची मोठी डोकेदुखी असल्‍याचे दिसून येते.
स्वच्छ भारत सुंदर भारत, हा उपक्रम ठिकठिकाणी सुरू असूनही अजूनही काही ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास घडतात, त्‍याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो. शहरालगत असलेल्‍या ग्रामपंचायतींमध्ये झपाट्याने विकास होत असला तरी घनकचरा व्यवस्‍थापनाचा अभाव आढळतो. परिणामी कचऱ्याची समस्‍या दिवसन्‌दिवस गंभीर होत आहे. सध्या बिरवाडीत लावलेल्‍या निनावी बॅनरमुळे कचरा कोंडीतून सुटका झाल्‍याने रहिवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

महाड ः बिरवाडीतील नाक्‍यावर बॅनर लावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com