जाहिरात फलकांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

जाहिरात फलकांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

महाड, ता. १४ (बातमीदार) : घाटकोपर येथे जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून राज्यातील सर्व ठिकाणच्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच बेकायदा होर्डिंगवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत. महाड शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात बेकायदा जाहिरात फलक असून शहरातील जाहिरात फलक त्वरित हटवावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून महाड नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळून १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या अशा जाहिरात फलकांकडे आता प्रशासनाचे लक्ष गेले आहे. रायगड जिल्ह्यातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, महामार्ग महामार्गावरील उड्डाणपूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा उभारलेले जाहिरात फलक दिसून येतात, परंतु यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर मात्र आपत्ती विभागाचे संचालक लहू माळी यांनी, याबाबत तातडीने परिपत्रक काढले असून महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनालाही याबाबत कळवले आहे. या सर्वांच्या हद्दीत असणारे सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्‍यानंतर बेकायदा असलेले सर्व जाहिरात फलक काढून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान महाड शहरांत असणारे अशा प्रकारचे फलक त्वरित काढावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुदेश कळमकर, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, माजी नगरसेवक प्रमोद महाडीक, शहर संघटक मंगेश देवरूखकर, उपशहर प्रमुख विजय तांबट, साहिल हेलेकर तसेच इतर यांनी याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे महाड शहरातही जाहिरात फलकांविरोधात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाड ः शहरातील भर चौकात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com