शैक्षणिक साहित्य महागले, पालकांचे बजेट कोलमोडले

शैक्षणिक साहित्य महागले, पालकांचे बजेट कोलमोडले

शैक्षणिक साहित्याला महागाईची झळ
पालकांच्या खिशाला कात्री
महाड, ता.४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील शाळा १२ व १५ जूनपासून सुरू होत असून पालक व विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके, दप्तरासह शालेय साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी करत आहेत. या वर्षी शालेय स्टेशनरी व वह्यांच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याने विद्यार्थी व पालकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. शैक्षणिक साहित्य खरेदी करणे गरजेचे असल्याने पालकांची पावले आता दुकानाकडे वळू लागली आहेत.
इंधनाचे वाढलेले दर, विविध देशांमधील युद्ध परिस्थिती व त्यामुळे निर्माण झालेली कागद टंचाई याचा शालेय साहित्य दरवाढीवर परिणाम झाला आहे. पेन्सिलपासून लाँगबुकपर्यंत सर्वच किमती वाढल्याने पालकांचे शैक्षणिक बजेट कोलमडले आहे. ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुले आहेत त्यांचा या वर्षीचा खर्च वाढणार आहे.
रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मोठ्या व लहान आकाराच्या वह्या, चित्रकला वही, प्रयोग वही, दप्तरे, नव्या वर्गाची पाठ्यपुस्तके, टिफिन, पेनपेन्सिल, कंपास पेटी, पाण्याची बाटली, खोडरबर, टोकयंत्र, पुस्तके कव्हर, गम यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालक व मुले दुकानात गर्दी करत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ६०० दुकाने शालेय साहित्यांनी सजली असून अनेक दुकानदारांनी सवलतीवरही भर दिला आहे.

आवडीनुसार पर्याय उपलब्ध
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार वह्या खरेदी करता येणे शक्य होणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांचा बदलता ट्रेड लक्षात घेता केजी टू पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी वह्यांवरील नवनवीन आकर्षक मुखपृष्ठ नामांकित कंपन्यांनी तयार करून बाजारात आणल्या आहे. यात चित्रपट कलाकार, बीटीएस कलाकार, क्रिकेट व इतर खेळाडू ,धबधबे, डोंगर दर्‌या असे नैसर्गिक देखावे, देश विदेशातील उंच व प्रसिद्ध इमारती, स्थापत्य नमुने, कार्टून अशी एकापेक्षा एक सरस मुखपृष्ठ असलेल्या आकर्षक वह्या मुलांना आकर्षित करत आहेत.

अनेक ब्रँड उपलब्ध
देश विदेशातील तसेच स्थानिक आणि ब्रँडचे तयार केलेले शैक्षणिक साहित्य दुकानात उपलब्ध झाल्याने मुलांना आपल्या ब्रँडनुसार खरेदी करता येणार आहे. बाजारात सध्या डोम्स, नवनीत, कॅमलिन, क्लासमेट, सुंदरम, सुदर्शन, अप्सरा, युवा, सम्राट, रिगल या ब्रँडच्या वह्या व इतर साहित्य तसेच काही स्थानिक कंपनीची साहित्य उपलब्ध झाली आहेत. महागाई वाढली असली तरीही ब्रँडेड खरेदी मुलांकडून केली जात आहे.

किमतीमध्ये वाढ
पेन्सिलपासून स्कूल बॅगपर्यंत सर्व साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
३ रुपयाची साधी पेन्सिल ५-७ रुपयांना तर १० रुपयांचे पेन १५ रुपयांवर पोहचले आहे.लहान वह्यांच्या किमतीत डझनला ६० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कंपास आणि कंपास साहित्य १५ टक्क्यांनी तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.स्‍कूल बँग व टिफिनचे शेकडो प्रकार दुकानात उपलब्ध असल्याने त्यांची खरेदीही वाढली आहे. दुकानदारांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दुकानातून खरेदी करावी याकरता काही सवलती देखील जाहीर केल्या आहेत. महागाईची झळ आता शाळेपर्यंत पोहोचली असली तरीही शैक्षणिक साहित्य गरजेचे असल्याने पालकांना ते खरेदी करावेच लागत असल्याचे पालक सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

शैक्षणिक साहित्यांच्या किमती यावर्षी वाढल्या आहेत. तरीही विविध दर्जेदार कंपन्यांनी आपली असंख्य उत्पादने बाजारात आणली आहेत बाजारामध्ये स्पर्धा असल्याने ग्राहकांना सवलती देखील दिल्या जात आहेत.
- डी. एस. सावंत (व्यापारी)


शालेय साहित्य दर
मोठी वही १०० पानी - ३८ - ६० रुपये
२०० पानी - ६० -७५ रु
वह्या लहान १०० पानी : ३० -४५ रु
ए ४ १५० पानी : ७५ -८५ रु
२०० पानी : ८५ -१०० रु.
कंपास पेटी १०० ते ३५०
स्कूल बॅग - ३५० -२०००


महाड ः शैक्षणिक साहित्याने दुकाने सजली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com