रखडलेल्‍या महामार्गासाठी होमहवन!

रखडलेल्‍या महामार्गासाठी होमहवन!

महाड, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, चाकरमान्यांना निर्विघ्न प्रवास करता यावा आणि महामार्गाच्या दयनीय अवस्थेतबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी जन आक्रोश समिती पुन्हा आंदोलनाच्‍या पवित्र्यात आहेत. सरकार दरबारी हजारो ई-मेल धाडण्याचा कार्यक्रम समितीने हाती घेतला आहे. याचबरोबर २८ जुलैला होमहवन तर १५ ऑगस्टला बेमुदत उपोषणाचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे.
जन आक्रोश समितीच्या मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये हे निर्णय घेण्यात आले. मुंबई-गोवा महामार्ग तब्बल सतरा वर्षे रखडला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दिलेल्‍या तारखा सरकारकडून पाळल्‍या जात नाहीत. केवळ पोकळ आश्वासने दिली जातात. यामुळे कोकणातील जनता त्रस्त झाली आहे. जन आक्रोश समितीने यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. लोकसभेमध्ये तब्बल ३७ हजार कोकणकरांनी नोटाला मतदान केले होते. विधानसभेच्या निवडणुकीतही नोटाचा पर्याय वापरण्याचा इशारा समितीने घेतला आहे.

ई-मेलसाठी लिंक, मायना तयार
घरातून, मोबाईलवरून एक ई-मेल आपल्या हक्कासाठी अशी कल्पना राबवून समितीकडून मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच विविध खात्याच्या मंत्र्यांना हजारो ई-मेल पाठवले जाणार आहेत. यासाठी लिंकही तयार करण्यात आली आहे. ई-मेल साठी वापरला जाणारा मायनाही देण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचे नाव व मोबाईल नंबर टाकून हे ई-मेल पाठवले जाणार आहेत. दोन दिवसांत हजारोच्या संख्येने ई-मेल कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरांतून सर्वांनी वैयक्तिकरीत्‍या पाठवण्यासाठी समाज माध्यमांवर आवाहन करण्यात आले आहेत. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

माणगावला होणार होमहवन
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात वारंवार विघ्‍न येत असल्‍याने माणगाव येथे २८ जुलैला सकाळी होम हवन केले जाणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जन आक्रोश समितीकडून करण्यात आले आहेत. त्‍यानंतर १५ ऑगस्टला बेमुदत उपोषण केले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे खड्डेमय मार्गावरील प्रवासामुळे आरोग्‍याच्या व्याधी बळावल्‍याच्या तक्रारी प्रवासी तसेच चालकांकडून करण्यात येत असून वाहने नादुरुस्‍त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com