दौलतगडावर सापडली पाषाणाची गणेश मूर्ती
दौलतगडावर सापडली पाषाणाची गणेशमूर्ती
इतिहास उजेडात येण्यास मदत; संकष्ट चतुर्थीनिमित्त साफसफाई मोहीम
महाड, ता. १६ (बातमीदार) : महाड तालुक्यातील दासगाव येथील दौलतगडावर दौलतगड प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या साफसफाई मोहिमेमध्ये आज १६ फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दगडी पाषाणाची प्राचीन मूर्ती सापडली आहे. यामुळे दुर्लक्षित असलेल्या दौलतगडाचा इतिहास उजेडात येण्यास मदत होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील दासगावजवळ दौलतगड हा प्रसिद्ध किल्ला आहे. यालाच दासगाव किल्ला असेही म्हणतात. इतिहासामध्ये हा किल्ला दुर्लक्षित जरी असला तरी काही स्थानिक तरुणांनी दौलतगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण दौलतगडावर तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीचे निमित्य साधून मशाल उत्सव साजरा करतात. दौलतगड प्रतिष्ठानतर्फे गेली तीन वर्षे दर शनिवार, रविवार गडाची साफसफाई केली जाते. ही साफसफाई करत असताना यापूर्वी त्यांना अनेक खापराचे तुकडे तसेच विटांचे तुकडे दौलतगडावर सापडले आहेत. आज १६ फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशाच प्रकारे गडाची साफसफाईचे काम नीलेश निवाते, देवव्रत निवाते, पांडुरंग निवाते व इतर अनेक दुर्ग सेवक करत होते. याचदरम्यान प्राथमिक शाळा दासगावच्या बाजूस, उत्तरेकडील बुरुजाच्या पायथ्यालगत खालच्या बाजूस पालथी पडलेली एक दगडी शिळा देवव्रत निवाते यांच्या नजरेस पडली. ही शिळा वैशिष्ट्यपूर्ण वाटल्याने त्यांनी तिला बाहेर काढले असता, ती गणपतीची मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या वेळी येथे जमलेल्या दुर्गप्रेमींना मोठा आनंद झाला. नुकताच भारत इतिहास संशोधक मंडळ येथील त्रैमासिकामध्ये दौलतगड किल्ल्याचा इतिहास महाड येथील इतिहास अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासक डॉ. अंजय धनावडे यांना अभ्यासासाठी पाचारण केले.
..................
अशी आहे मूर्ती
गडावर सापडलेली गणेशमूर्ती काळ्या पाषाणाची व डाव्या सोंडेची असून, मूर्तीची उंची सव्वा फूट आहे. चार हातांची, किरीट मुकुटधारी, परशु, पाश, मोदकपात्र आणि वरद मुद्रेत आहे. मूर्तीवर शिलाहार काळातील शिल्पशैलीचा प्रभाव आहे. हे शिल्प झिजले असले तरी ते अतिशय सुबक आहे.
.........
शिवपूर्वकाळातील हे शिल्प तेराव्या-चौदाव्या शतकातील असावे, परंतु ही मूर्ती सुस्थितीत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील पूजेत असावी. गडावर मृदभांड अवशेषदेखील अनेक ठिकाणी आढळून येतात. या गणेशमूर्तीच्या लागलेल्या शोधामुळे खऱ्या अर्थाने आता दौलतगडाचा इतिहास उलगडू लागला आहे, असे कोकण इतिहास परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. अंजय धनावडे यांनी सांगितले.
.....
फोटो - दौलतगडावर सापडलेली गणेश मूर्ती
सापडलेल्या गणेशमूर्तीसह अंजय धनावडे, नीलेश निवाते व इतर सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

