

महाड, ता. १८ (बातमीदार) : खैरे धरण नळ पाणीपुरवठा योजना महाड तालुक्यातील सर्वांत मोठी योजना आहे. या योजनेतून १९ गावे व २९ वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. सुमारे ११ हजार लोकसंख्या या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असून, २५ वर्षांपूर्वी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सध्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे योजनेचा कारभार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील खैरे धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे परिसरातील गाव-वाड्यांतील पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता महेश नामदे, नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड, प्रकल्प सल्लागार संदीप गांगुर्डे, उद्योजक सीताराम उभारे, तालुका संपर्कप्रमुख इकबाल चांदले, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती शुएब पाचकर व पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावांना मिळणार योजनेचा लाभ
योजनेअंतर्गत विभागातील खैरेतर्फे तुडील, वलंग, आदिस्ते, रोहन, ओवळे, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, चिंभावे सुतारकोंड, वराठी, गोमेंडी, ताडवाडी, जुई बुद्रुक, कुंबळे, कोसंबी, सोनघर, रावढळ, वामने सापेतर्फे तुडील, लोअर तुडील, बेबलघर इत्यादी गावांना शुद्ध जलपुरवठा योजनेचा लाभ मिळणार आहे. गावातील घराघरांत शुद्ध जलपुरवठा होणार असल्याने विभागातील ग्रामस्थांमधून समाधन व्यक्त होत आहे.
नियमित देखभालीची मागणी
जिल्हा परिषदेमार्फत अनेक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती न झाल्याने आधीच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाली होती. आता कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने निर्माण झालेल्या जलशुद्धीकरण केंद्राबाबत दूरदृष्टी ठेवून त्याची देखभाल व दुरुस्ती नियमित व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई
जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (ता. १६) झाले. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना, जिल्हा परिषद विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांची ही भावना माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी, आपल्या भाषणातून बोलून दाखवल्याने मंत्री गोगावले यांनीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत या वेळी दिले.
महाड ः जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.