निसर्गाचा स्वच्छतादूत तरस गैरसमजुतीचा शिकार

निसर्गाचा स्वच्छतादूत तरस गैरसमजुतीचा शिकार
Published on

निसर्गाचा स्वच्छतादूत तरस गैरसमजुतीचा शिकार

जागतिक तरस दिन

सुनील पाटकर, महाड

निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणून आपल्याला केवळ गिधाडे माहीत आहेत. परंतु गिधाडांपेक्षा एक पाऊल पुढे जात निसर्गाच्या स्वच्छतेत आपले मोठे योगदान देणारा तरस (हायेना) हा शिकारी प्राणी आज गैरसमजूत आणि अंधश्रद्धेचा शिकार झाला आहे. मानवी उत्क्रांतीच्या संपूर्ण इतिहासाचा साक्षीदार असलेला आणि मानवापूर्वीच पृथ्वीवर अस्तित्व असलेल्या तरसाचे अस्तित्व सध्या धोक्यात आलेले आहे. २७ एप्रिलला सर्वत्र जागतिक तरस दिन साजरा होत असतानाच निसर्गाच्या परिसंस्थेत महत्त्वाचे स्थान असलेल्या या वन्यजीवाच्या संवर्धन व रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
लहानपणी अनेक दंतकथा, बालगोष्टी आपल्या कानावर पडत असतात. यात तरसाची प्रतिमा अत्यंत वाईत व दुष्ट प्राणी अशी तयार करण्यात आली आणि पुढे समाजात हीच प्रथा रूढ झाल्याने तरस दिसला तर त्याला थेट मारण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. तरस हे चेटकिणीचे वाहक असल्याची अंधश्रद्धा अनेक राज्यात आहे. तरस मुले पळवतात आणि गुरेढोरे मारतात, असा गैरसमज आहे. त्‍यामुळेच तरसांची संख्याही घटली आहे.

जगभरात ठिपकेदार तरस (स्पॉटेड हायेना), तपकिरी तरस (ब्राऊन हायेना), आर्डवूल्फ तरस आणि पट्टेदार तरस (स्ट्राईप्ड हायेना) अशा चार प्रजाती आढळतात. भारतात केवळ पट्टेदार तरस आढळतो. अधिवासाच्या दृष्टीने इतके मोठे भौगोलिक क्षेत्र असूनही तरस हा मोजक्या ठिकाणीच आढळून येतो. भारतात आजही तरसाविषयी अंधश्रद्धा आहेत. तरसाचा वावर मानवी भागात असूनही अनेकांना या प्राण्याविषयी पुरेसे ज्ञान नाही. तरसाच्या अंगावर असणारे पट्टे हे वाघाच्या अंगावरील पट्ट्यांसारखे दिसत असल्याने अनेकांना तरस वाघासारखा वाटतो. मानवाशी समरस होण्याची तरसाची तयारी असल्याने ते मानवी वस्तीत अनेकदा आढळतो. तरस हा निशाचर आहे. रात्री खाद्याच्या शोधात रस्ता ओलांडताना तरसांचा रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. अंधश्रद्धेमुळे तरसांच्या शरीराच्या अवयवांचीही तस्करी केली जाते. भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये तरसांचे अवयव पारंपरिक औषधनिर्मितीकरिता विकले जातात. जगभरात तरसांची संख्या फक्त दहा हजार इतकी मर्यादित राहिली आहे. त्यामुळेच सरकार आणि वन्यजीव संस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तरसांच्या संवर्धनासाठी प्रयत्‍न आवश्‍यक
अशोका ट्रस्‍ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी ॲण्ड इन्वॉर्नमेंट या (ATREE) वन्यसंस्थेने तरसांना काँलर टॅगिंग करून त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास सुरू केला आहे. यातूनच तरसाची क्रूर प्राणी ही प्रतिमा बदलणे शक्य होणार आहे. तरस करत असलेल्या नैसर्गिक स्वच्छतेची माहिती लोकांना देवून याबाबत जागरूकता निर्माण करत येणार आहे. तरस कोरड्या गवताळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, दऱ्या, जंगल, झाडी आणि शेतीसारख्या विविध अधिवासांमध्ये आढळतात. जंगलात आणि शेतीच्या आसपासच्या भागातील शव हे त्यांचे खाद्य आहे. या व्यतिरिक्त फळे, काही कीटक किंवा अधूनमधून छोटी शिकार ते करतात. मानवासोबत आपला अधिवास करण्याची तरसांची तयारी असून ते या अधिवासात समरस होत आहेत. मानवानेही पुढाकार घेत या प्राण्यांविषयी सजगता बाळगली तर तरसांचे संवर्धन शक्य असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com