पाणीटंचाईमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत

पाणीटंचाईमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत

Published on

पाणीटंचाईमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत
रायगडच्या पायथ्याशी पाणीटंचाई

महाड, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यामध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असून, रायगड किल्ल्याचा पायथा व परिसरातील पर्यटन व्यवसायाला फटका बसतो आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने अनेक व्यावसायिकांना खासगी टँकर्स मागवावे लागत असून, त्‍यामुळे आर्थिक बोजा पडत आहे.
दोन-तीन दिवस अवेळी पाऊस पडला असला तरीही महाड तालुक्यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. सद्यःस्थितीत महाड तालुक्यातील १२० ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे जनजीवन विस्कळित होत असतानाच याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होताना दिसत आहे.
रायगड किल्ल्याचा पायथा व परिसरामधील गावे सध्या पाणीटंचाईची झळ सोसत आहेत. त्‍यामुळे पिण्यासाठी पाणी नाही, तर पर्यटकांना कुठून देणार, अशी परिस्थिती गावांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील अनेक लहान-मोठे व्यावसायिक खासगी टँकरद्वारे पाणी मागवत आहेत.
एप्रिल व मे महिन्यांमध्ये शाळांना सुट्टी पडत असल्याने पालकवर्ग व मुले घराबाहेर पडत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत असतो. रायगड किल्ल्यावरदेखील या हंगामामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, परंतु रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गाव, पाचाड, बौद्धवाडी, मोहल्ला, पाचाड नाका, बाउलवाडी या ठिकाणी सद्यःस्थितीमध्ये महाड पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय ज्या ठिकाणी शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा आहे, त्या हिरकणी वाडीमध्येही पाणीटंचाई भेडसावत आहे. हिरकणी वाडीलाही पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
सरकारी टँकरने एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्‍याने ग्रामस्थांची तहान भागत नाही. त्यातच या गावांमध्ये रायगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्थादेखील आहे. लहान मोठी हॉटेल्स व होम स्टेदेखील आहेत. या सर्वांना पाण्याची मोठी गरज लागते, परंतु पाचाड व परिसरातील पाणीसाठे पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना सरकारी टँकरवर, तर व्यावसायिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
खासगी टँकरचालकांकडून १७०० ते १८०० रुपये आकारण्यात येत असल्‍याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पर्यटन व्यवसायही अडचणीत सापडला आहे. गडावर पर्यटक येत आहेत, परंतु त्यांना देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने पर्यटकांनाही विकतचे पाणी घ्यावे लागते. पाचाडमध्ये अनेक तलाव असून, ते कोरडे पडले आहेत, तर नळ पाणीयोजना आधीच कोरड्या पडल्‍या आहेत. पाचाड येथील जल जीवन योजनेचे काम सुरू करण्यात आले असून, तेदेखील रखडल्याने पाचाड गाव व वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईची झळ पोहोचत असते.

पाचाड गावामध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. याचा त्रास आम्हा व्यावसायिकांना सहन करावा लागतो. नळ पाणीयोजनाही अपुरी आहे. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पदरमोड करून खासगी टँकरने पाणी मागवावे लागत आहे.
- अनंत देशमुख, हॉटेल व्यावसायिक

महाड ः पाचाड परिसरातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलाची पायपीट करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com