पावसामुळे पेरणीची कामे खोळंबली

पावसामुळे पेरणीची कामे खोळंबली

Published on

महाड, ता. २९ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाला सुरुवात झाली असून ऐन पेरणीच्या हंगामात पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची भातपेरणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. शेतीत पाणी साचल्‍याने आता पारंपरिक पद्धतीने पेरणी करणे अवघड झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी मे महिन्यातच मशागतीची कामे पूर्ण करतो. यामध्ये झाडांची पाने तसेच शेणखत यांचा तरवा तयार करून तो जाळला जातो व त्यानंतर नांगरणी करून भातपेरणीची कामे केली जातात; परंतु रायगड जिल्ह्यात १९ मेपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने व त्यानंतर चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्रावर पेरणीची कामे करतात.
रोहिणी नक्षत्र शेतीला पूरक मानले जाते. रोहिणी नक्षत्रामध्ये पेरणी केल्यास उत्पन्न चांगले येते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. या वर्षी २५ मेपासून रोहिणी नक्षत्र लागले आहे. त्यामुळे या दिवसापासून पेरणीची कामे शेतकरी करणार होते. तत्पूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता शेतामध्ये पाय ठेवणे ही शेतकऱ्याला अवघड झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तरव्याची कामेदेखील केली नाहीत. भातपेरणीसाठी नांगरणी व तरवेही तयार झालेले नाहीत. त्यामुळे पेरणीचीच कामे होत नसल्याने शेती कशी होणार, या विवंचनेत शेतकरी आहेत. धूळफेक पद्धतीने बियाणे शेतात फेकून पेरणीची कामे होतात; परंतु आता शेतजमीन पूर्णपणे ओली झाली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने भातपेरणी करणे अशक्य झाले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तसेच महाड तालुक्यातही भाताचे क्षेत्र घटले आहे. त्यातच आता पेरणीचे नष्टचक्र मागे लागल्याने शेती संपणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये यंदा ८१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाणार आहे. तर महाड तालुक्यात आठ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र घटलेले आहे; परंतु तालुक्यात कोठेही पेरणीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे शेतीमध्ये आणखीनच घट होण्याची शक्यता आहे.

बियाण्यांना मोड आणून पेरणी
आपत्कालीन परिस्थितीमध्ये भात बियाण्यांना मोड आणून थेट पेरणी करण्याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे. शेतकऱ्यांनी भात बियाणे भिजवून ३६ ते ४८ तास त्याला बारदानामध्ये गुंडाळून मोड आणावेत व हे मोड आल्यानंतर त्याची चिखलामध्ये पेरणी करावी, असा पर्याय कृषी विभागाकडून सुचवण्यात आला आहे. महाड तालुका कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार अशा प्रकारे सल्ला दिला जात आहे.
पारंपरिक पद्धतीला छेद देऊन अशा प्रकारे पेरणी केल्यानंतरही भातपीक किती हातात येईल, याबाबतदेखील शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

पावसामुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेता, पेरणीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि पेरणी व अन्य शेती मार्गदर्शनाबाबत कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
- धीरज तोरणे, कृषी अधिकारी, महाड

महाड ः पेरणी न झाल्याने शेती ओसाड पडली आहे.

...........

भातलागवडीखालील क्षेत्रात घट
महाड (बातमीदार) ः जिल्ह्यात भातपिकाखालील क्षेत्र दहा वर्षांत झपाट्याने कमी होत आहे. १० वर्षांत तब्बल ४६ हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र घटले असून यंदा त्‍यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भात, नाचणी ही पिके घेतली जातात. १० वर्षांपूर्वी भातलागवडीखालील क्षेत्र एक लाख ३० हजार हेक्टर एवढे होते. या वर्षी खरीप हंगामात केवळ ८१ हजार ३३५ हेक्टर एवढे क्षेत्र असल्याचे खरीप हंगाम बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

शेती झाली पडीक

मजुरांची कमतरता, रखडलेले सिंचन प्रकल्प, रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणात संपादित केलेल्या जमिनी तसेच प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. त्यातच लहरी हवामानाचा फटका, पूर, प्रदूषण, भरतीचा फटका यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागातील शेतजमिनींना बांधकाम उद्योगामुळे सोन्याचा भाव मिळाल्याने येथे टोलेजंग इमारती उभ्या राहतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले. उरण परिसरात बंदरे विकसित झाली. यामुळे शेतीपेक्षा जमीन व्यवहाराची उलाढाल वाढली आहे.

रायगडची ओळख नष्ट होणार
भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी असलेली ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाडचे प्रसिद्ध पांढरे वाल, खाडीपट्ट्यात होणारे वाल, पावटा शेती जल प्रदूषणामुळे बंद झाली. पनवेल तालुक्यातून तूर लागवड; पनवेल, मुरूड आणि उरण तालुक्यातील मूग लागवड; अलिबाग, पेण, मुरूड येथील उडीद लागवड आता जवळपास हद्दपार झाली आहे. जिल्ह्यात आता गुजरातचा पावटा, चवळी, परराज्यातील मटकी आणि मूग दिसत आहे.

कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. मजूर कमतरता व खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती केली पाहिजे. अवजारांचा व यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला पाहिजे.
- टी. एस. देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com