रायगडमध्ये महायुतीमध्ये वाद
रायगडमध्ये महायुतीमध्ये वाद
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमटणार पडसाद
महाड, ता. ३ (बातमीदार) : राज्यात सत्तेमध्ये असलेल्या महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामधील स्थानिक पातळीवरील मतभेद आता विकोपाला गेल्याचे पाहावयास मिळत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले व इतर दोन आमदारांनी उघडपणे टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याने रायगड जिल्ह्यामध्ये महायुती धोक्यात आली आहे. त्यामुळे याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पूर्वीपासूनच वाद आहेत. हे वाद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळीच्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी रोजगार हमी योजनांमध्ये भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका करत नॅपकिन दाखवून त्यांची नक्कल केली होती. यानंतर तटकरे यांच्या टीकेला शिवसेनेने ही उत्तर दिले होते. १ जूनला मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत मंत्री भरत गोगावले यांच्यासह कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुनील तटकरे यांनी नॅपकिनवरून भरत गोगावले यांची नक्कल केली होती. त्यामुळे या सभेत उपस्थितांना नॅपकिनचे वाटप करून प्रत्युत्तर देण्यात आले. भर सभेमध्ये महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र करताना मर्यादा सोडल्याचे पाहावयास मिळाले. सिंचन घोटाळ्याची फाइल अजून बंद झालेली नाही, असा इशारादेखील त्यांनी या वेळी दिला, तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्थानिक महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही तर फक्त युती असेल, असा इशारा दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये महायुती संकटात आल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला इतर आमदार आणि त्यांच्या मतदारसंघात मदत न केल्याचे आरोप खासदार सुनील तटकरे करत आहेत. तर खासदार सुनील तटकरे यांनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे संबंधित आमदार करत आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप व टीकाटिप्पणी पाहावयास मिळत आहे.
...................
मतदारसंघात काट-शहचे राजकारण
मंत्री भरत गोगावले यांना महाड मतदारसंघात शह देण्यासाठी स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात सहभाग दिला. त्यांच्या माध्यमातून भरत गोगावले यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून भविष्यात केले जाणार आहेत, अशीच राजकीय व्यूहरचना अलिबाग व कर्जत मतदारसंघातदेखील बांधली जात आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारी दरी अजूनच वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. शिवसेनेचे मंत्री व तीन आमदारांपुढे तटकरे यांचे वर्चस्व कायम राहते की शिवसेनेच्या आमदारांना भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. सद्यःस्थितीमध्ये मात्र राज्यातील महायुतीत रायगड जिल्ह्यात बिघाड झाल्याचे चित्र दिसत आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.