रायगडावर गर्जली तुतारीची ललकारी

रायगडावर गर्जली तुतारीची ललकारी

Published on

महाड, ता. ९ (बातमीदार) : राज सदरेवरील वेदघोष आणि मंत्रघोष, छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीवरील दुग्ध व जलाभिषेक, रायगडच्या कड्याकपारीत दुमदुमणारा शंखनाद, तुतारीची ललकारी आणि सोबतीला असलेले भगवे फेटे परिधान केलेले हजारो मावळे अशा मंगलमय वातावरणात रायगड किल्ल्यावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी संपूर्ण रायगड शिवप्रेमींच्या उत्साहात न्हाऊन गेला होता.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड किल्ल्यावर सोमवारी (ता. ९) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे ३५२ शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. राज सदरेवर सजविलेल्या मेघडंबरीसमोर शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. रविवारी सायंकाळी शिरकाई देवी पूजन, गडपूजन व गोंधळाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी नगारखान्याजवळ ध्वजारोहण करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत शिवप्रतिमेची पालखी राज सदरेवर आणण्यात आली. राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये व वेद घोषामध्ये मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ यांच्याकडून विधिवत पूजन पार पडले. मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम पार पडला. दीप प्रज्ज्वलन, जगदीश्वराचे स्मरण, शंख पूजन, शंखनाद, अथर्वशीर्ष पठण, महासंकल्प, धर्मरक्षण शपथ असे धार्मिक विधीही पार पडले.
रायगड किल्ल्यावरील अल्हाददायक व शिवमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, स्वागत अध्यक्ष रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार मंगेश चव्हाण, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रूपेश म्हात्रे, खासदार श्रीरंग बारणे, समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
-------------------------
नव्या पिढीने अनुभवला अनुपम सोहळा
राज सदरेवर छत्रपती शिवरायांची चांदीची उत्सवमूर्ती आणण्यात आली. या उत्सवमूर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.‘जय भवानी’, ‘हर हर महादेव’चा जयघोष राज दरबारात दुमदुमला. शिवराज्याभिषेकाचा पहिला सोहळा पाहू न शकलेल्या आजच्या पिढीला याचि देही याचि डोळा हा सोहळा पुन्हा पाहता आल्याचा आनंद शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसत होता. या सोहळ्यानंतर रायगड पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
-----------------
शाही शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्य सोहळ्यापूर्वी रायगडावर होळीच्या माळावर दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी असे मर्दानी खेळ; तर शाहिरी पोवाडे, कलगी-तुरा, गोंधळ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपासून हजारो तरुण शिवप्रेमी शिवराज्याभिषेक दिनासाठी चाळीसगाव ते रायगड अशी रायगड मोहीम राबवत असतात. दरवर्षी नवीन तरुणांना रायगड दर्शन घडविणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांचादेखील सन्मान करण्यात आला. शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर ढोल-ताशे, लेझीम, हलगी व मृदुंगाच्या वाद्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शाही शोभायात्रा मंदिराकडे नेण्यात आली.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com